Breaking News

पनवेलमध्ये नमो नवमतदार संमेलन उत्साहात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला ऑनलाईन संवाद

पनवेल : रामप्रहर वृत्त
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पनवेलमध्ये गुरुवारी (दि.25) नमो नवमतदार संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या संमेलनात देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मतदार युवा पिढीशी ऑनलाईन संवाद साधून मार्गदर्शन केले.
जगातील सर्वांत मोठी लोकशाही म्हणून भारत देशाची ओळख आहे. म्हणूनच मतदार आणि मतदानाला देशात अनन्यसाधारण महत्त्व आहे. याच अनुषंगाने देशातील युवा पिढी प्रथम मतदान करीत असताना त्यांना लोकशाहीच्या महत्त्वपूर्ण अविभाज्य प्रक्रियेची माहिती व्हावी, त्यांनी या प्रक्रियेत स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवमतदार अर्थात युवा पिढीला संबोधित केले. या संमेलनास भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, माजी नगरसेविका रूचिता लोंढे, शिक्षक सेलचे जिल्हा संयोजक के. सी.पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा नेते दिनेश खानावकर, विनायक मुंबईकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष व शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, रोहित जगताप, चिन्मय समेळ, मयूर आंग्रे, विवेक होन, रूपेश नागवेकर, प्रशांत शेट्टे, हेमंत ठाकूर, भाऊ भगत, खांदा कॉलनी युवा अध्यक्ष अभिषेक भोपी, प्रसाद हनुमंते, देवांशु प्रभाळे यांच्यासह नवमतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुमचे एक मत आणि देशाच्या विकासाची दिशा एकमेकांशी जोडलेली असून हे एक मत भारताला जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनवणार आहे. तुमचे एक मत भारतात स्थिर आणि मोठ्या बहुमताचे सरकार देणारे, डिजिटल क्रांतीला अधिक ऊर्जा देणारे असून क्रांती घडवत जगात भारताची विश्वासार्हता वाढवणारे आहे, अशा शब्दांत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्गदर्शन करताना नवमतदारांमध्ये ऊर्जा निर्माण केली. ते पुढे म्हणाले की, जेव्हा स्थिर सरकार असते तेव्हा देश मोठे निर्णय घेतो. अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडवतो आणि पुढे जातो. पूर्ण बहुमत असलेल्या आमच्या सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवून अनेक दशकांची प्रतीक्षा संपवली. आमच्या सरकारने पूर्ण बहुमताने लष्करातील जवानांसाठी वन रँक, वन पेन्शन लागू करून देशाच्या माजी सैनिकांची चार दशकांची प्रतीक्षा संपुष्टात आणली. देशातील प्रत्येक घटकाचा विचार सरकारने करीत लोकोपयोगी निर्णय आणि अंमलबजावणी केली. आमच्याकडे पूर्ण बहुमताचे सरकार आहे, ज्याने नारी शक्ती वंदन कायदा लागू करून देशातील महिलांची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपवली. आमच्या सरकारनेच तिहेरी तलाक कायदा करून मुस्लिम भगिनी आणि मुलींना न्याय मिळण्याची आशा वाढवली आहे. हे आमचे सरकार आहे, ज्याने तीन दशकांच्या प्रतीक्षेनंतर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले. हे आमचे सरकार आहे ज्याने एससी, एसटी, ओबीसी यांचे हित जपले.
पूर्वी भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांच्या बातम्या रोज हेडलाईन बनत असत. कोट्यवधी रुपयांचे घोटाळे सर्रास झाले. त्या अंधकारमय परिस्थितीतून आपण देशाला बाहेर काढू शकलो याचे आम्हाला समाधान आहे, असे सांगून पंतप्रधान मोदी म्हणाले की, मतदार यादीत तुमची नावे नोंदविल्याबरोबर तुम्ही लोकशाहीचा एक महत्त्वाचा भाग बनले आहात. उद्या आपला देश 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे आणि त्या अनुषंगाने तुमची सर्वांची जबाबदारी सर्वांत मोठी असणार आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त देशवासीयांना शुभेच्छा! आज भारताची चैतन्यशील लोकशाही साजरी करण्याची संधी आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply