आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नांना यश
उरण : वार्ताहर
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाची (एनएमएमटी) बससेवा ही कोपरखैरणे (बस नं. 31) व कळंबोली (बस नं. 30) ते उरण येथील उरण चारफाटापर्यंत सुरू होती. लवकरच ती उरण शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये याकरिता दोन वेळेत सुरू करण्यात येणार आहे. या संदर्भात आमदार महेश बालदी यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक झाली.
एनएमएमटी बससेवा सुरू करण्याबाबत आमदार महेश बालदी यांच्या संपर्क कार्यालयात सोमवारी (दि. 1) एनएमएमटीच्या अधिकार्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली. या वेळी बस उरण शहरात पूर्वीप्रमाणे दोन वेळेत लवकरच सुरू होणार हे ठरले.
या बैठकीस आमदार महेश बालदी यांच्यासह नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप गटनेते व तालुका अध्यक्ष रवी भोईर, नगरसेवक व शहर अध्यक्ष कौशिक शाह, नगरसेवक राजेश ठाकूर, एनएमएमटीचे मुख्य वाहतूक अधिकारी अनिल शिंदे, वाहतूक अधिकारी सुनील साळुंखे, सहाय्यक आगार व्यवस्थापक धर्मराज भगत आदी उपस्थित होते.
एनएमएमटीची बससेवा आधी उरणमधील पेन्शनर पार्कपर्यंत सुरू होती, परंतु उरण शहरातील रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे बससेवा शहरात बंद करण्यात आली. उरण चारफाटापर्यंत ही सेवा सुरू होती. त्यामुळे लहान मुले, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक यांचा विचार करता त्यांना होणारा त्रास कमी व्हावा या उद्देशाने बससेवा पुन्हा सुरळीत करण्यात येत आहे.
दरम्यान, एनएमएमटी बस सकाळी 9.30पर्यंत व रात्री 8 नंतर पेन्शनर पार्कपर्यंत सुरू असणार आहे, तर सकाळी 9.30पासून व रात्री 8पर्यंत उरण चारफाटा येथे थांबेल.