Breaking News

वादळी वार्यासह पावसाच्या हजेरीने मुरूडकर धास्तावले

मुरूड ः प्रतिनिधी

कोकण किनारपट्टीवर दोन दिवस वादळ आणि सोसाट्याचा वारा धडकणार, हा हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे. मुरूड येथे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जोरदार वारा व पाऊस सुरू झाला होता, मात्र थोडा वेळ बरसणार्‍या या पावसाने मुरूडकर चांगलेच धास्तावले. आधीच दोन दिवस सतत बत्ती गुल होत असल्याने मुरूडकर बेजार झाले होते. त्यात या वादळाने काही काळ सर्वच घाबरले होते.

मुरूड खोरा बंदरात सकाळी वार्‍यासोबत लाटांचे तांडव पाहायला मिळाले. नवीनच झालेल्या खोरा जेटीवर 20 फुटी लाटा जोरजोरात धडकत होत्या. समोरच जंजिरा किल्ला आहे. येणार्‍या लाटा किल्ल्याच्या बुरूजापर्यंत उंची गाठत होत्या. डाव्या बाजूला असलेल्या राजपुरी गावाच्या तटबंदीलाही लाटांचे तांडव सहन करावे लागत होते.

शासनाच्या आदेशानुसार कोळी बांधवांची एकही बोट समुद्रात गेली नाही. सर्व बोटी आगरदांडा खाडीत विसावल्या असून पूर्णपणे सुरक्षित आहेत. वादळाचे हे तांडव काही काळच होते, अन्यथा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले असते.

जिल्ह्यात सरासरी तीन मिमी पावसाची नोंद

रायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 3.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच 1 जूनपासून आजअखेर सरासरी 24.06 मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद घेण्यात आली.

त्यानुसार अलिबाग 1.00 मिमी, पेण 0.00 मिमी, मुरूड-3.00 मिमी, पनवेल 2.00 मिमी, उरण 2.00 मिमी, कर्जत 2.00 मिमी, खालापूर 0.00 मिमी, माणगाव 12.00 मिमी, रोहा 7.00 मिमी, सुधागड 2.00 मिमी, तळा 7.00 मिमी, महाड 1.60 मिमी, पोलादपूर 8.00 मिमी, म्हसळा 4.00 मिमी, श्रीवर्धन 4.00 मिमी, माथेरान 2.00 मिमी असे एकूण पर्जन्यमान 57.60 मिमी इतके होते. त्याची सरासरी 3.60 मिमी इतकी आहे.  पर्जन्यमानाची सरासरी टक्केवारी 0.77 टक्के आहे.

कोकण किनार्‍यावर भरती-ओहोटी वाढण्याची शक्यता

अरबी समुद्रात तयार झालेल्या वायू चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर समुद्र खवळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गुरुवारी (दि. 13) या भागातील समुद्रात मोठ्या प्रमाणात भरती-ओहोटी येणार असल्यामुळे कोकण किनारा जिल्ह्यातील समुद्रकिनारे पर्यटक आणि स्थानिकांसाठी बंद ठेवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती निवारण कक्षाने दिली आहे.

वायू चक्रीवादळामुळे कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनार्‍यांवर मोठ्या प्रमाणात भरती-ओहोटी येणार आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांसाठी समुद्रकिनारे बंद ठेवण्याच्या सूचना राज्य शासनाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच पुढील 48 तासांत मच्छीमारांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे आदेशही देण्यात आल्याचे राज्य आपत्ती निवारण कक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Check Also

संकट काळात ठाकूर कुटुंबियांनी केलेली मदत जनता विसरणार नाही -जरीना शेख

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या संकट काळात लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांतदादा ठाकूर, परेशदादा ठाकूर …

Leave a Reply