कर्जत : बातमीदार
नेरळ गावातून बाहेर पडण्यासाठी असलेल्या रस्त्याचे काँक्रीटकरण केले जाणार असल्याने 5मार्च 2019 पासून बंद असलेला रस्ता आता खुला होणार आहे. गटारे बांधणे आणि रस्त्याचे काँक्रीटकरण करण्यासाठी बंद करण्यात आलेला नेरळ पाडा भागातील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, हा रस्ता बंद असल्याने वाहनचालकांना शहरात येण्यासाठी मारावे लागणारे हेलपाटे वाचणार आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या निधीमधून रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभाग नेरळ गावातील रस्त्याचे काँक्रीटकरण करीत आहे. नेरळ गावातील आठ रस्त्यांचे काँक्रीटकरण करण्यासाठी असलेला 23 कोटीच्या निधीमधील नेरळपाडा भागातील रस्त्याचे काम अपूर्ण होते. नेरळ गावातून बाहेर मुरबाड, कळंब, कशेळे भागात जाण्यासाठी हा रस्ता महत्वाचा असल्याने रस्ता बंद केल्याने वाहतूक कोंडी होत होती. 5 मार्च 2019 पासून ठेकेदाराने रस्ता खोदल्याने पलीकडे जाणार्या आणि शहरात येणार्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नेरळ गावातून पलीकडे 500 मीटरवर असलेल्या साई मंदिर चौकात जाण्यासाठी 8 किलोमीटरचा फेरा मारून कर्जत रस्त्याने आंबिवली गेट किंवा कल्याण रस्त्याने दामत गेट येथून हेलपाटे मारून जावे लागत आहे. त्यात आंबिवली फाटा ते दामत फाटा हा रस्ता कच्चा, खाचखळग्यांचा असल्याने वाहनचालक या रस्त्याने जाताना जीव मुठीत घेऊन जात आहेत.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार कालावधी लक्षात घेता रस्ता वेळेआधी खुला करण्याच्या हालचाली सुरू आहेत. निवडणुकीची रणधुमाळी आणि उमेदवारांचे नेरळ भागातील दौरे लक्षात घेता 5मार्चपासून वाहतुकीस बंद असलेला नेरळ पाडा गेट रस्ता खुला करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांचा हेलपाटे वाचणार आहेत.
-गटारांसह रस्त्याचे सिमेंट काँक्रीटकरण असे मंजूर आहे. वाहतूकीची अडचण लक्षात घेऊन रस्त्याचे काँक्रीटकरण आधी करण्यात आले असून, गटारांची कामे नंतर केली जाणार आहेत.
-ए. ए. केदार, उपअभियंता, जि. प. बांधकाम विभाग
-जनतेची मागणी म्हणून मुदती आधी हा रस्ता खुला करण्यात येत आहे, मात्र रस्ता खराब झाल्याचे दिसून आल्यास जनतेची मागणी पुढे करून ठेकेदार आपले खापर जनतेवर फोडण्यास तयार असेल. मात्र आम्ही रस्त्यांच्या दर्जाबाबत उठवत असलेला आवाज थांबवणार नाही. – अंकुश शेळके-उपसरपंच,नेरळ