Breaking News

रायगडात भीषण पाणीटंचाई

210 गाव-वाड्यांसाठी टँकरची व्यवस्था

अलिबाग : प्रतिनिधी
उन्हाचा पारा जसा वर चढू लागला आते तसे रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटके दिवसेंदिवस अधिक जाणवू लागले आहेत. जिल्ह्यातील उरण, पनवेल, कर्जत, खालापूर, पेण, सुधागड, रोहा, महाड, पोलादपूर या नऊ तालुक्यांमधील मिळून 39 गावे आणि 171 वाड्यांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर श्रीवर्धन या एका तालुक्यात एक विहीर अधिग्रहीत करण्यात आली आहे.
उरण तालुक्यातील पाच वाड्यांना दोन खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पनवेल तालुक्यातील दोन गावे आणि तीन वाड्यांना एका खाजगी टँकरद्वारे पाणी पुरविले जात आहे. कर्जत तालुक्यातील दोन गावे आणि सात वाड्यांची तहान दोन खाजगी टँकर्सद्वारे भागविली जात आहे. खालापूर तालुक्यातील एक गाव व दोन वाड्यांची पाण्याची मागणी एका खाजगी टँकरद्वारे पूर्ण केली जात आहे. पेण तालुक्यातील 10 गावे आणि 74 वाड्यांना सात खाजगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. सुधागड तालुक्यातील एक वाडीसाठी एका खाजगी टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. रोहा तालुक्यातील चार गावे व दोन वाड्यांना सामाजिक संस्थेच्या एका टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. महाड तालुक्यातील सहा गावे व 42 वाड्यांना पाच खाजगी टँकर्सद्वारे पाणी पुरविले जात आहे. पोलादपूर तालुक्यातील 14 गावे व 35 वाड्यांची तहान पाच खाजगी टँकर्सद्वारे भागविली जात आहे.
अशा प्रकारे जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील पाणीटंचाईग्रस्त एकूण 210 गाव-वाड्यांमध्ये 24 खाजगी व सामाजिक संस्थेच्या मदतीने एक असा 25 टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर श्रीवर्धन या एका तालुक्यात एक विहीर अधिग्रहीत करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली.

Check Also

आदई डोंगरावर वृक्षारोपण अभियान

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तपर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आदई डोंगरावर …

Leave a Reply