Breaking News

घारापुरीला सागरी तटबंदी; संरक्षक भिंतीसाठी 37.50 कोटींच्या कामाचा शुभारंभ

उरण : प्रतिनिधी

जेएनपीटीच्या 37.50 कोटी खर्चाच्या मंजूर करण्यात आलेले आणि मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या घारापुरी बेटासभोवार उभारण्यात येणार्‍या संरक्षक भिंत व सागरी तटबंदीच्या कामाचा शुभारंभ सोमवारी (दि. 15) करण्यात आला. यासाठी आमदार महेश बालदी आणि स्थानिकांनी मागणी केली होती. बेटासभोवार उभारण्यात येणार्‍या सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या तटबंदीमुळे समुद्राच्या लाटाने सागरी किनार्‍याची होणारी प्रचंड थांबण्यास मदत होणार आहेच. शिवाय बेटाच्या सभोवताली फेरफटका मारण्याचा आनंदही बेटावर दरवर्षी येणार्‍या लाखो पर्यटकांना लुटता येणार आहे. जेएनपीटी बंदराच्या उभारणीमुळे जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटावरील सागरी किनारपट्टीची प्रचंड धूप झाली आहे. समुद्राच्या भरतीच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी धूप थांबविण्याची मागणी आमदार महेश बालदी व स्थानिक ग्रामस्थांनी केली होती, तसेच जेएनपीटीकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यामुळे जेएनपीटीने बेटावरील किनारपट्टीची मोठ्या प्रमाणावर होणारी सागरी धूप थांबविण्यासाठी बेटासभोवार सुमारे तीन किलोमीटर लांबीची संरक्षक भिंत, तटबंदी उभारण्यासाठी 37.50 कोटी खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. या कामाच्या निविदा मंजूरीनंतर जेएनपीटीने कामाची वर्कऑर्डरही काढली आहे. घारापुरी सागरी तटबंदीचे काम मागील दोन वर्षांपासून रखडले होते. परिणामी मागील उधाणाच्या भरतीच्या समुद्राचे पाणी किनारपट्टीची पातळी सोडून आता सुमारे 15 मीटर अंतरापर्यंत आत घुसले आहे. शिवाय समुद्राच्या पाण्याच्या प्रचंड लाटांनी घारापुरी बेटावरील शेतबंदर, मोराबंदर, राजबंदर या तीन्ही गावांसभोवार असलेल्या किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. तसेच मोराबंदर, शेतबंदर या दोन गावात समुद्राचे पाणी शिरण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. मोरा बंदर किनार्‍यावरील तर रस्तेच उध्दवस्त होऊन वाहुन गेले आहेत. समुद्राच्या सागरी किनारपट्टीबरोबरच बेटावरील गावांनाही धोका निर्माण झाला आहे. याबाबत आमदार महेश बालदी व स्थानिकांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांकडे सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता. अखेर पर्यावरण विभागाकडून परवानग्या मिळविण्यात यश मिळाले आहे. त्यानंतर जेएनपीटीच्या माध्यमातून एलिफंटा बेटावरील राजबंदर ते शेतबंदर अशी समुद्र किनार्‍याला लगत साधारण तीन किलोमीटर लांबीची संरक्षण भिंत उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी ठेकेदार फेरो सिमेंट इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे प्रकल्प अधिकारी यादव यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.

जेएनपीटी प्रशासनाचे आभार बेटासभोवार उभारण्यात येत असलेल्या सागरी तटबंदी, संरक्षण भिंतीमुळे समुद्राच्या लाटांमुळे होणारी समुद्र किनार्‍याची धूप थांबणार आहे, तसेच बेटावर येणार्‍या पर्यटकांना एलिफंटा बेटाच्या सभोवताली पर्यटन करण्यास मिळणार आहे. यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी जेएनपीटी प्रशासनाचे आभार व्यक्त करुन धन्यवाद दिले आहेत.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply