नवी मुंबई : प्रतिनिधी
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळमार्केटमध्ये सध्या परदेशी सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे. भारतातील सफरचंदांचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना इराण येथून सफरचंद बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहेत.
सफरचंद खायला गोड, रंगाने लाल आणि दिसायला आकर्षक असते; तसेच आरोग्यासाठी गुणकारी समजले जाते. त्यामुळे सफरचंदाला वर्षभर मागणी असते. सध्या बाजारात इराणी सफरचंदाला मोठी मागणी आहे. किरकोळ बाजारात इराणी सफरचंदाला दर्जानुसार 120 ते 180 रुपये किलो भाव मिळत आहे. डिसेंबर ते मार्च या दरम्यान परदेशी फळांचा हंगाम असतो.
यामध्ये इराण आणि तुर्कीचे सफरचंद मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल होतात.
अफगाणिस्तानमधील अस्थिर वातावरणामुळे महिनाभरापूर्वी इराणी सफरचंद बोटीने मुंबई बंदरात पाठविण्यात येत होती. तेथून देशभरात ती सफरचंद विक्रीस पाठविली जात होती. अफगाणिस्तानमधील वातावरण निवळल्यानंतर इराण, अफगाणिस्तान, पाकिस्तानमार्गे अटारी सीमेवरून वाहनांमधून इराणी सफरचंद उत्तर भारतातील बाजारपेठेत पाठविण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईतील बंदरात, तसेच अटारी सीमेवरून इराणमधील सफरचंद सध्या बाजारात विक्रीस पाठविण्यात येत असून आवक वाढल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत इराणमधील सफरचंदांचे दरही कमी झाले आहेत, असे एपीएमसी फळबाजारातील व्यापारी भरत देवकर यांनी सांगितले.
काश्मीरमधील सफरचंदांचा हंगाम आटोपत आल्याने किरकोळ बाजारात सध्या काश्मीरमधील सफरचंदाची विक्री प्रतिकिलो 60 ते 90 रुपये दराने केली जात आहे. तर किन्नर सफरचंद 55 ते 80 रुपये दराने घाऊक बाजारात विकले जात आहे. हिमाचल प्रदेशातील सफरचंदांचा हंगाम संपला असून सध्या बाजारात इराणमधील सफरचंदे उपलब्ध आहेत.
इराणी सफरचंद चकचकीत असतात. चकचकीतपणा येण्यासाठी मेणाचा वापर करण्यात येत नाही. कश्मीरमधील सफरचंदांप्रमाणे इराणी सफरचंद चवीला गोड आहेत, मात्र या सफरचंदांच्या आतील भाग हिमाचल प्रदेशातील सफरचंदांप्रमाणे काहीसा कडक असतो.
-भरत देवकर, व्यापारी