Breaking News

…अन् जिल्हा महिला व बालविकास अधिकार्यांनी रोखले बालविवाह

अलिबाग : जिमाका

टाळेबंदी लागू असतानाही रायगड जिल्ह्यात विवाह सोहळे सुरू असून चक्क बालविवाहांच्या घटनाही समोर येत आहेत. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे बालकांचे विवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर रायगड जिल्हा बाल संरक्षण कक्षाने तातडीने हालचाली करुन हे बालविवाह रोखले. तसेच या बालकांचे आई-वडील व नातेवाईकांना समज देण्यात आली व योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. त्या सर्वांचे समुपदेशन करण्यात आले.

अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे बालकांचे विवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या माध्यमातून मिळाल्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उज्वला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता सपकाळ, जिल्हा परिविक्षा अधिकारी एस. एम. वाघमारे, समुपदेशक अजिनाथ काळे यांनी प्रत्यक्ष गावात भेट दिली. त्यावेळी मापगाव येथील भावंडे, त्यापैकी मुलीचे वय 16 वर्षे व मुलाचे वय 19 वर्षे होते. मुलीचा विवाह निश्चित करण्यात आलेल्या मुलाचे वय 19 वर्षे व मुलाचा विवाह निश्चित करण्यात आलेल्या मुलीचे वय 17 वर्षे इतके होते. तेे पोयनाड नागझरी आदिवासीवाडी येथील रहिवासी आहेत. चारही  नियोजित वधू-वर अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले.

या वेळी बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 अन्वये या अल्पवयीन बालकांचे विवाह होणार नाहीत, याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या. त्यांच्या पालकांकडून जबाबनामा लिहून घेऊन, त्यांना समज देण्यात आली. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सुजाता सपकाळ यांनी पालकांना मार्गदर्शन केले तर अजिनाथ काळे यांनी समुपदेशन केले. अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उज्वला पाटील यांनी दिली.

मापगाव येथील पोलीस पाटील अपेक्षा टुळे, अलिबाग पोलीस स्टेशनमधून मिनल मगर, क्षेत्रीय कार्यकर्ता दशरथ चौधरी, संदीप गवारे, चाईल्ड लाईन प्रतिनिधी अमोल जाधव, सखी वन स्टॉप सेंटरच्या प्रतिनिधी मोहिनी रानडे, प्रशांत घरत या वेळी उपस्थित होते.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply