Breaking News

पालीतील व्यापार्यांना ऑनलाइन गंडा

पोलिसांचे सतर्क राहण्याचे आवाहन

पाली : प्रतिनिधी

आर्मीचा कॅम्प पालीजवळ लागला आहे, त्यासाठी दूध, दही, पनीर, किराणा, जेवण, भाजीपाला आदी पाहिजे असे फोनवर सांगून एटीएम फोटो आणि पिन नंबर घेवून पालीतील व्यापार्‍यांची ऑनलाइन फसवणूक केली जात असल्याच्या घटना बुधवारी (दि. 21) समोर आल्या आहेत. यासंदर्भात व्यापार्‍यांनी सतर्क राहण्याचे आवाहन पाली पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी केले आहे.

आपल्या गावाशेजारी आर्मीचा कॅम्प लावला आहे, त्याकरीता आम्हाला दूध, दही, पनीर, किराणा, भाजीपाला पाहिजे असे फोनवर सांगून हे ऑनलाइन फसवणूक करणारे इसम माल खरेदी करतात. खरेदी केलेला किंवा बनविलेला माल घेऊन जाण्यासाठी आमची गाडी येईल, असे सांगतात. त्याआधी तुमचा एटीएम कार्डचा फोटो आणि पिन नंबर द्या, आम्ही खरेदी केलेल्या मालाची रक्कम ऑनलाइन ट्रान्स्फर करतो. असे सांगतात. एटीएमचा फोटो आणि पिन नंबर मिळाल्यावर त्या खात्यातील रक्कम ते काढून घेत आहेत. पालीतील संतोष शिंदे या हॉटेलवाल्याला बुधवारी जेवणाच्या 35 डब्यांची ऑर्डर देऊन, याच पध्दतीने त्यांच्या मुलीच्या खात्यातून 2600 रुपये लंपास केले आहेत. डेअरीवाले विक्रम चौधरी यांनादेखील दूध, पनीर व दही आदींची ऑर्डर दिली होती. पैसे पाठवतो असे सांगून त्यांना क्यूआर कोड पाठविला व तो स्कॅन करण्यास सांगितला मात्र चौधरी यांनी शंका आल्याने त्यांनी कोड स्कॅन केला नाही. तेव्हड्यात त्यांना संतोष शिंदे यांची अशाच प्रकारे फसवणूक झाल्याचा फोन आला. बल्लाळेश्वर मंदिराजवळील हॉटेल व्यवसाईक बाळा मोरे यांनादेखील जेवणाची ऑर्डर देण्यात आली होती. पैसे पाठवतो असे सांगून एटीएमचा फोटो व पिन देण्यास सांगितला. मात्र मोरे यांनी देणार नाही असे सांगितले.

 याबाबत सर्व व्यापार्‍यांनी जागरूक राहून असे फोन आल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन पाली व्यापारी असोसिएशनचे सेक्रेटरी विक्रम चौधरी यांनी केले आहे.

अनोळखी नंबरवरून फोन आल्यास मालाची ऑर्डर घेऊ नये. आपले एटीएम फोटो, ओटीपी व पिन तसेच अकाउंट संबधीची माहितीदेखील कोणाला सांगू नका.

-विजय तायडे, पोलीस निरीक्षक, पाली, ता. सुधागड

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply