पनवेल : वार्ताहर
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केल्याच्या कारणावरून नवीन पनवेल येथील शांतिनिकेतन शाळेतील फी काउंटर बंद करण्याची मागणी पालकांनी केली आहे. 25 ते 30 पालक शाळेच्या गेटसमोर जमले होते. त्यांनी मुख्याध्यापकांसमोर ही मागणी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने शाळा बंद आहेत. त्यामुळे बर्याच शाळांनी ऑनलाइन क्लासेस सुरू केलेले आहेत. या क्लासेसचे फी भरण्यासाठी शाळांमधून पालकांकडे व विद्यार्थ्यांकडे तगादा लावला जात असल्याचे समोर आले आहे. कोरोना असल्याने पालकांकडे फी भरण्यासाठी पैसे नाहीत त्यातच शांतिनिकेतन शाळेकडून फी न भरणार्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद केले असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे 20 एप्रिल रोजी पालकांनी शाळेसमोर बसून मुख्याध्यापकांना फी न घेण्याची मागणी केली. शाळा बंद असल्याने अॅक्टिव्हिटीज शिकवल्या जात नाहीत तरीदेखील अॅक्टिव्हिटीज फी मागत आहे. त्यामुळे ती फी शाळेने मागू नये, अशी मागणी पालकांनी केली. यावेळी शाळेने पोलिसांना पाचारण केले होते. दरम्यान, शांतिनिकेतन शाळेच्या मुख्याध्यापकांसोबत बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बोलण्याचे टाळले.