पनवेल : प्रतिनिधी
शांतीवन आश्रमातील अनाथ वंचित मुलांसाठी अन्नधान्य आणि किराण्याच्या मदतीची गरज असल्याचे समजल्यावर पनवेलच्या संवेदना चॅरिटेबल संस्थेतर्फे 33,500 रुपयांचा धनादेश शांतिवन आश्रमाला देण्यात आला. ही माहिती अध्यक्ष सुनेत्रा गवाणकर यांनी दिली.
अनाथ वंचित मुलांसाठी दोन घास हवे आहेत आणि यासाठी शांतिवनला अन्नधान्य आणि किराणा साठी मदतीची गरज आहे, अशी बातमी आमच्या एका सोशल गृपवर मिळाली आणि कुठेतरी त्या मुलांसाठी जीव गलबलून गेला. या कोरोनाच्या काळात असे अनेक वंचित लोक आहेत. ज्यांना मदतीची आवश्यकता आहे. मग आपल्यातल्या रोजच्या घासातील एक दोन घासाएवढी मदत तर प्रत्येक जण नक्कीच करू शकतो. वयक्तीक पातळीवर छोटीशी मदत करायची असते, परंतू काही वेळा इच्छा असून शक्य होतेच असे नाही, परंतू एकीचे बळ खूपच बलशाही असते. म्हणून संवेदना सख्या मात्र एकत्रित मदत करून गेले नऊ वर्ष जमेल तेवढा हातभार लावून अश्या अनेक संस्थांना मदत करीत आहेत.
शांतिवन ही संस्था मराठवाड्यातील बीड या दुर्गम जिल्ह्यात अनाथ, वंचित मुलांसाठी संगोपन आणि शिक्षणाचे काम करते. रस्त्यावर टाकून दिलेले किंवा मातेने नाकारलेल्या एक दिवसाच्या बाळापासून 18 वर्ष वयापर्यंतची 300 मुलंमुली या संस्थेत लहानाची मोठी होत आहेत. शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय केवळ लोकांच्या मदतीवर ही संस्था चालते. कोरोना थांबायचे नावच घेत नाही. त्यामुळे अजून काही दिवस येथील भेटी बंद आहेत, पण असे असले तरीही येथील अनाथ वंचित मुलांच्या निवासी प्रकल्पासाठी लागणारे किराणा, अन्नधान्य, वैद्यकीय आणि इतर आवश्यक खर्च सुरूच आहेत. ते भागवण्यासाठी तारेवरची कसरत होत आहे. यामुळे मोठी आर्थिक कोंडी निर्माण झाली आहे. त्यात हा प्रकल्प इतक्या ग्रामीण भागात आहे की इथे लवकर कुणी पोहचत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना संस्थेतर्फे 33,500 रुपयांचा धनादेश दिला आहे. शक्य असेल त्यांनी या संस्थेला मदत करावी, असे आवाहन संवेदना संस्थेच्या आध्यक्षा सुनेत्रा गवाणकर यांनी केले आहे.