पनवेल : रामप्रहर वृत्त
विद्यार्थ्यांनो आपल्या भागात विमानतळामुळे नोकरीच्या अनेक संधी आज निर्माण झाल्या आहेत. नवनवीन उद्योग आपल्या भागात येत आहेत. म्हणूनच जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शिक्षण घेत तुम्ही जीवनात यशस्वी व्हा आणि खूप प्रगती करा, असा मोलाचा सल्ला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिला.
संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विभाग अर्थात ज्युनिअर कॉलेजचे 26वे स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा शनिवारी (दि.27) उत्साहात झाला. त्या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर अध्यक्षस्थानावरून बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणातून पारितोषिक मिळवणार्या विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.
या सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण उपअधिकारी (माध्यमिक) हेमलता गावित, विशेष अतिथी विमा संचलनालय वांद्रे मुंबईचे सहाय्यक संचालक शिवदास पोटे, संस्थेच्या संचालक मंडळ सदस्य संजय भगत, वर्षा ठाकूर, स्वप्नील ठाकूर, सचिव डॉ. एस.टी. गडदे उपस्थित होते. त्याचप्रमाणे संकुलातील मराठी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक कैलास सत्रे, उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य प्रशांत मोरे, मराठी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सुभाष मानकर, इंग्रजी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नीलिमा शिंदे, पर्यवेक्षक अजित सोनवणे, कैलास म्हात्रे, स्वाती पाटील, वैशाली पारधी तसेच पालक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी हजर होते.
विशेष अतिथी हेमलता गावित आपल्या भाषणातून म्हणाल्या की, या संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात यशस्वी कामगिरी करत आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. ते आधुनिक युगातील दानशूर कर्ण, दानशूर माऊली आहेत. त्यांचा आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे. जीवनात कोणतेही अपयश आले तरी न डगमगता खंबीरपणे सामना करून त्याचे यशात रूपांतर करता आले पाहिजे, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.
प्रमुख पाहुणे शिवदास पोटे यांनी म्हटले की, सीकेटी कॉलेज हे सर्वात शिस्तबद्ध आणि स्वच्छ असे कॉलेज आहे. विद्यार्थ्यांनो जीवनात तुम्ही शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी कमवायला शिकले पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते केवळ वाचून चालणार नाही, तर ते तुम्हाला प्यावेच लागेल. जीवनात आई-वडिलांना आणि शिक्षकांना कधीच विसरू नका.
प्रास्ताविकात उच्च माध्यमिक विभागाचे प्राचार्य प्रशांत मोरे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली तसेच उच्च माध्यमिक विभागाच्या सतत उंचावणारा एचएससी बोर्ड निकाल, राबवले जाणारे विविध उपक्रम, क्रीडा क्षेत्राची इनडोअर आणि आउटडोअर कामगिरी, एनएसएस युनिट अशा सर्व बाबींचा उल्लेख प्राचार्यांनी केला.
उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये परीक्षा विभाग, मेकरथॉन, आदर्श विद्यार्थी, विद्यार्थी विशेष पुरस्कार, विशेष कामगिरी शिक्षक पुरस्कार, एनएसएस स्वयंसेवक पुरस्कार तसेच शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धा, विभागीय,राज्य या विविध स्तरावर क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या क्रीडापटूंचा, शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. प्राचार्य प्रशांत मोरे यांना पिल्लई युनिव्हर्सिटी नवीन पनवेलतर्फे प्रतिष्ठित कॅडमीक लीडरशिप एक्सलन्स अवॉर्ड 2025 मिळाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यानंतर ’योद्धा’ या विशेष अशा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून इयत्ता अकरावी कला, वाणिज्य व विज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी सुंदर असे नृत्याविष्कार सादर केले. आपल्या नृत्याविष्कारातून विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे, महाराणा प्रताप, पृथ्वीराज चौहान, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी, ताराबाई, हंबीरराव मोहिते, हिरकणी यासारख्या योद्ध्यांनी केलेल्या पराक्रमाचे नृत्य स्वरूपात सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. सहाय्यक शिक्षिका अपर्णा मुकणे आणि योगिता जोरी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. वंदे मातरम आणि आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी
पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …
RamPrahar – The Panvel Daily Paper