Breaking News

तक्का, कामोठ्यात लसीकरण केंद्र सुरू करा!

पनवेल मनपा सभागृह नेते परेश ठाकूर यांची आयुक्तांकडे मागणी

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिका हद्दीतील तक्का, पोदी, काळुंद्रे व भिंगारी येथील नागरिकांसाठी तक्का मराठी शाळा क्रमांक 11 येथे, तसेच कामोठे सेक्टर 21 येथील समाजमंदिर येथे नव्याने कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रभाग क्रमांक 20मधील तक्का मराठी शाळा क्रमांक 11 येथे तक्का, पोदी, काळुंद्रे व भिंगारी येथील नागरिकांसाठी केंद्राची उभारणी करावी, अशी मागणी नगरसेवक अजय बहिरा यांनी, तर कामोठे शहरातील नव्याने दुसरे लसीकरण केंद्र सेक्टर 21मध्येे सुरू करण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक गोपीनाथ भगत यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने ठाकूर यांनी ही मागणी आयुक्तांकडे केली.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या देशभर सर्वत्र कोरोना (कोविड-19) विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असून, या विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये याकरिता केंद्र सरकार शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. याच धर्तीवर या विषाणूची लागण अन्य व्यक्तींना होऊ नये यासाठी पनवेल महापालिका प्रशासनामार्फत योग्य ती कायदेशीर उपाययोजना केली जात आहे, मात्र महापालिका हद्दीतील सद्यस्थिती पाहता रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. महापालिकेमार्फत करण्यात येणार्‍या लसीकरणाबाबतची सद्यस्थिती पाहता प्रभागातील नागरिकांना लसीकरण करण्याकरिता पनवेल महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 1, 2, 3, 4, 5 व 6 केंद्रांवर जावे लागते. या वेळी लसीकरण केंद्रावर टोकन घेण्यासाठी नागरिकांना रांगेत तासन्तास उभे राहावे लागते. त्याचबरोबर लसीकरण केंद्रावर दिवसाला 100 ते 125 जणांचे दैनंदिन लसीकरण करण्यात येत आहे, परंतु केंद्राबाहेर 300 ते 400 नागरिकांची गर्दी दिवसेंदिवस दिसून येते. त्यामध्ये फक्त 100 ते 125 नागरिकांना टोकन मिळून फक्त त्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. उर्वरित नागरिकांना टोकन न मिळाल्याने पनवेल महापालिका प्रशासनाबद्दल नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.
या समस्येवर उपाययोजना करण्याकामी आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ न होणेकरिता पनवेल महापालिका प्रशासनामार्फत तक्का येथील मराठी शाळा क्र. 11 येथे नव्याने लसीकरण केंद्रांची व्यवस्था करण्यात यावी, तसेच कामोठे सेक्टर 21मधील समाजमंदिर येथे नव्याने लसीकरण केंद्र सुरू करावे, जेणेकरून तक्का, पोदी, काळुंद्रे व भिंगारी तसेच कामोठे गावातील व शहरातील नागरिकांना लसीकरण करण्याकरिता होणारा नाहक त्रास सहन करावा लागणार नाही, तसेच प्रभागातील रहिवाशांना लसीकरण करणेदेखील सोयीचे होईल. त्याचबरोबर नागरिकांना लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रोत्साहित करता येईल. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना त्यापासून वेळेत उपचार घेता येतील आणि नागरिकांची गैरसोयही होणार नाही व आधार मिळेल. याचबरोबर त्यांच्यामार्फत दैनंदिन प्रगती अहवाल याची नोंद घेणेही सोयीचे होईल व नागरिकांना वेळेत लसीकरण घेता येईल, असे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सूचविले आहे.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन पनवेल महापालिका हद्दीतील तक्का, पोदी, काळंद्रे व भिंगारी तसेच कामोठे गावातील व शहरातील नागरिकांसाठी नव्याने लसीकरण केंद्राची उभारणी करण्याकरिता पनवेल महानगरपालिका प्रशासनामार्फत योग्य ती उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारीवर्गाला आदेश देण्यात यावे, असेही सभागृह नेते परेश ठाकूर यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply