Breaking News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची रविवारी (दि. 14) जयंती. त्यानिमित्त या महामानवाला विनम्र अभिवादन. महाराष्ट्राविषयी डॉ. आंबेडकर हे नेहमीच आस्था बाळगून होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, मुंबई महाराष्ट्रापासून अलिप्त करण्याचा काँग्रेसचा डाव यावर त्यांनी आपली प्रखर मते मांडली. त्याचा हा गोषवारा…

संयुक्त महाराष्ट्र राज्य निमिर्तीसाठी महाराष्ट्रीय माणसांनी अत्यंत संघटितपणे चिवट असा लढा दिला आणि संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार केले. या लढ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांपेक्षा अगदी भिन्न व वेगळी अशी भूमिका बजावली. काँग्रेसच्या मूळ धोरणानुसार स्वातंत्र्यपूर्व काळात भाषावार प्रांतनिर्मितीचे वचन देण्यात आले होते. न्या. दार यांच्या अध्यक्षतेखाली 1948 साली भाषावार प्रांतरचनेच्या संदर्भात एक आयोग नेमण्यात आला. या आयोगापुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘महाराष्ट्र अ‍ॅज ए लिंग्विस्टिक प्रॉव्हिन्स’ या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण आणि तुलनात्मक आकडेवारीसह निवेदन सादर केले. यामध्ये मुंबई महाराष्ट्राची आहे, यासंबंधी त्यांनी अत्यंत जोरदार समर्थन केले. ‘भाषावार प्रांतरचनेची मागणी मान्य केल्यास मुंबई शहर महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असल्यामुळे ते महाराष्ट्रापासून अलग करू नये,’ असे बाबासाहेबांनी स्पष्ट नमूद केले होते.

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कुटील डाव चालले होते. या कृतीचा तीव्र शब्दात निषेध करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे कृत्य निषेधार्ह आहे. मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असून भौगोलिक, ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्रापासून मुंबई विलग करण्याचे कोणतेही षडयंत्र खपवून घेतले जाणार नाही आणि अशी कृती न्यायाला धरून होणार नाही. मुंबईतील मराठी लोकांच्या कर्तृत्व, कष्ट आणि कर्तबगारीवर त्यांचा पूर्ण विश्वास होता. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या

मागणीच्या आंदोलनापूर्वीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वरील विचार लेखी स्वरूपात मांडले होते.

प्रामाणिकपणा, कर्तव्याची जाणीव व राष्ट्रीय हिताची दृष्टी ही महाराष्ट्राची परंपरा असल्याचे बाबासाहेब म्हणत.  महाराष्ट्राची परंपरा टिकवायची असेल, तर महाराष्ट्रातील माणसाने विद्याव्यासंग सोडता कामा नये; त्यामुळे आपण आपली परंपरा टिकवू शकू, आपणामध्ये प्रामाणिकपणा आणि कर्तव्याची जाणीव असावी. त्यामुळे राष्ट्रीय हिताची दृष्टी ही परंपरा आपण राखू शकू, असे त्यांचे म्हणणे होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाची जागृती व लोकशिक्षणाकरिता वृत्तपत्रे काढली ती मराठीमधून. आपले वृत्तपत्र भाषिकदृष्ट्या दर्जेदार असावे याबाबत त्यांचा कटाक्ष होता. ‘बहिष्कृत भारत’ हे वृत्तपत्र त्यांनी 1927मध्ये काढले. यासाठी त्यांनी मराठी भाषेचा अभ्यास केला. मराठी भाषेतील मुकुंदराज, मुक्तेश्वर, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास इत्यादी संतांचे वाङ्मय त्यांनी अभ्यासले, तसेच केसरी, ज्ञानप्रकाश, संदेश, चित्रमय जगत, विविध ज्ञानविस्तार इत्यादी वर्तमानपत्रांत प्रसिद्ध होणार्‍या साहित्य-स्वरूपाचाही आपल्या वृत्तपत्रासाठी विचार केला. वृत्तपत्रासाठीचे लेखन हायकोर्टातील लायब्ररीत स्थानीय एल्फिन्स्टन रोड, चर्चगेट या रेल्वे स्टेशनवर व स्वतःच्या ऑफिसात जसा वेळ मिळेल त्यानुसार त्यांनी केले. शुद्ध मराठमोळी धाटणीची भाषा, तर्कशुद्ध विचार त्यांच्या वृत्तपत्रातून वाचावयास मिळे. गोपाळ हरी देशमुख तथा लोकहितवादी यांची शतपत्रे ‘बहिष्कृत भारत’मध्ये क्रमशः प्रसिद्ध केली पाहिजेत, असे त्यांना वाटले. लोकहितवादींचे पहिले पत्र सात डिसेंबर 1928च्या अंकामध्ये प्रसिद्ध झाले. पुढे लोकहितवादींची ही शतपत्रे श्री. रा. टिकेकर यांनी 1940मध्ये पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली. श्री. रा. टिकेकर यांनी याबाबत डॉ. आंबेडकरांचा सल्ला घेतला होता.

काही वृत्तपत्रे, ती प्रसिद्ध करणार्‍या संपादकांच्या विचार व हेतूवर आधारित बिरूदावलीने प्रसिद्ध होतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘बहिष्कृत भारत’ हे वृत्तपत्र अस्पृश्यांच्या दास्य विमोचनाचा क्रांतिकारी विचार प्रसारित करणारे होते. आपल्या वृत्तपत्रात भाषेचे सौंदर्य आणि मराठी वाङ्मयीन साहित्य लेखन असावे, जेणेकरून पत्राचा दर्जा उत्तम राहील; तसेच लोकशिक्षण आणि साहित्याचा आस्वाद वाचकांना घेता यावा; जागरण आणि प्रबोधनाबरोबरच ज्ञानाचा व माहितीचा पुरेपूर उपयोग व्हावा, यासाठी ते प्रयत्नशील असत.

-अ‍ॅड. सु. बा. वाघमारे, (लेखक निवृत्त शिक्षण उपसंचालक आहेत)

Check Also

शिवसेना ‘उबाठा’चे नवीन पनवेल उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शिवसेना …

Leave a Reply