Breaking News

…तर ‘जेएसडब्ल्यू’विरोधात आंदोलन

आमदार रविशेठ पाटील यांचा कंपनी प्रशासनाला इशारा

पेण : प्रतिनिधी

जेएसडब्ल्यू कंपनीने स्थानिकांबाबत निर्माण केलेल्या प्रश्नांकडे कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. त्यात कंपनी व्यवस्थापनाने सुधारणा केली नाही तर कंपनीविरोधात आंदोलन करू, मोर्चा आणू, कंपनीचे गेट बंद करू असा इशारा पेणचे आमदार रविशेठ पाटील यांनी पेण येथे दिला. जेएसडब्ल्यू कंपनी बाधित कार्यकर्त्यांची विचार सभा पेणमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये उपस्थितांनी नोकरी, पिण्याचे पाणी, जमिनीचा मोबदला, मालवाहू बोटींमुळे निर्माण झालेल्या खांडी व त्यामुळे नापिक झालेली शेतीबाबतचे प्रश्न उपस्थित केले. त्यासंदर्भात आमदार रविशेठ पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. पेण तालुक्यातील लोक पुर्वी भातशेती करीत होते, तेव्हा खांडी जात नव्हत्या, प्रदुषण नव्हते, मात्र वडखळ परिसरात जेएसडब्ल्यू कंपनी आली आणि सारे चित्रच पालटले. आता भातशेती पिकविण्यायोग्य राहिली नाही. भरतीचे खारे पाणी खांडीत गेल्याने खारेपाट विभागातील भातशेती नापीक बनली आहे. हवा-पाण्याच्या प्रदुषणात वाढ झाल्याने लोक आजारी पडत आहेत. श्वसनाचे आजार वाढले आहेत. जेएसडब्ल्यू कंपनीत अजूनही स्थानिकांना नोकरी मिळत नाही. नागोठणेपासून गडब-वडखळपर्यंतच्या लोकांना कंपनी पिण्याचे पाणी मूबलक देत नाही. खाड्यांची दुरूस्ती होत नाही. हे सारे जेएसडब्ल्यू कंपनीमुळे झाले आहे. त्यात कंपनीने वेळीच सुधारणा न केल्यास तसेच स्थानिकांना नोकरी-पाणी न दिल्यास जेएसडब्ल्यू विरोधात आंदोलन करू, असा इशारा आमदार रविशेठ पाटील यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांसमोर दिला. जेएसडब्ल्यू कंपनीमुळे निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्याविषयी कंपनी व्यवस्थापनाला निवेदन देण्यात येणार असल्याचे भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांनी यावेळी सांगितले. रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वैकुंठ पाटील, भाजपचे जिल्हा चिटणीस बंडू खंडागळे, राजेश मपारा, पेण तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, बाळाजीशेठ म्हात्रे, माजी नगराध्यक्ष रघुनाथ बोरेकर, व्ही. बी. पाटील यांच्यासह जेएसडब्ल्यू बाधीत शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply