Breaking News

पनवेलमध्ये वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे लोकार्पण

आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी लोकांची अहोरात्र सेवा करणारे नेते -रामेश्वर नाईक

पनवेल : रामप्रहर वृत्त
आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांच्या रूपाने लोकांची अहोरात्र सेवा करणारे नेते मिळाले आहेत आणि ते पनवेल उरण रायगडचे भाग्य असून हे दोन्ही आमदार लोकसेवक आहेत, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी आज (01 जानेवारी) येथे केले. महाराष्ट्रातील हे पहिले वैद्यकीय सहाय्यता कक्ष असून अशाचप्रकारे राज्यभरात वैद्यकीय सहाय्य कक्ष उभारणार असल्याचे त्यांनी या वेळी नमूद केले.
केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध वैद्यकीय योजना तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा मदतनिधी पनवेल व उरण तालुक्यातील आदिवासी, गरीब, गरजू नागरीकांपर्यंत पोहोचवून त्यांच्या निरोगी आणि दीर्घायु जीवनासाठी भारतीय जनता पार्टी पनवेल आणि उरण विधानसभा मतदार संघाच्या वतीने पनवेल भाजप कार्यालय येथे वैद्यकीय सहाय्यता कक्ष उभारण्यात आले आहे. या मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण सोहळा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते व मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या वेळी पनवेल विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर, उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, दिबासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, पनवेलचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, उरणच्या माजी नगराध्यक्षा सायली म्हात्रे, माजी नगरसेवक संतोष भोईर, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, प्रभाकर जोशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रामेश्वर नाईक यांनी पुढे बोलताना सांगितले की, आरोग्याच्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार जागरूक आहे. पंचतारांकित अशा रुग्णालयात सुद्धा गोर गरिबांसाठी काही जागा आरक्षित करण्यात आले आहे. महात्मा फुले जीवनदायी, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व इतर योजनांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. संपूर्ण मोफत किंवा अत्यल्प दरात उपचार देण्याचा उद्देश आहे. असे सांगतानाच या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी खूप चांगले काम केले असून पनवेलमध्ये उभारलेले हे वैद्यकीय सहाय्यता कक्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. त्याचबरोबर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीचे पोर्टल या कार्यालयासाठी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply