नवी मुंबई मनपाकडून परिस्थितीचे सूक्ष्म सर्वेक्षण
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कोरोना महामारीने संपूर्ण जग ग्रासले आहे. भारतामध्ये कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारी-मार्च मध्ये आली आणि एप्रिलमध्ये कोरोना रुग्णसंख्येेने संपूर्ण देशात भयावह परिस्थिती निर्माण केली. त्यादृष्टीने नवी मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी वेळोवेळी उपाययोजना सुरू होत्या. त्यामुळे कोरोनाच्या दुसर्या लाटेतून नवी मुंबई सावरू लागली आहे. रुग्ण वाढ नियंत्रणात आली असून कोरोनामुक्त होणार्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. घातक ठरलेली लाट थोपविण्यासाठी मनपाने सूक्ष्म नियोजन व सर्वेक्षणावर भर दिला आहे.
नवी मुंबईमध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीपर्यंत कोरोनाची स्थिती नियंत्रणात होती. मनपाने फक्त वाशीमधील सिडको प्रदर्शन केंद्र सुरू ठेवले होते. शहरातील तीन नागरी आरोग्य केंद्रांचा परिसर कोरोनामुक्त झाला होता; परंतु मार्चपासून रुग्ण झपाट्याने वाढू लागले व आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली. त्यामुळे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी रुग्णालयीन सुविधा वाढविण्याबरोबर प्रत्येक घडामोडीचे सूक्ष्म सर्वेक्षण करून नियोजन करण्यास सुरुवात केली.
कोरोना नियंत्रणासाठी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. याशिवाय उपचार सुरू असलेल्या सर्व खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आले. विभाग अधिकारी व प्रत्येक विभाग कार्यालयासाठी स्वतंत्र नोडल ऑफिसर नियुक्त करण्यात आला. डॉक्टर्स व अधिकारी यांची जवळपास 100 जणांची मुख्य टीम तयार झाली आहे. या सर्व डॉक्टर्स व अधिकारी यांच्यासोबत सायंकाळी साडेसात ते रात्री साडेदहा अशी तीन तास बैठक घेतली जात आहे. दिवसभरातील कामाचा आढावा. कुठे समाधानकारक काम सुरू आहे. कुठे उणिवा राहत आहेत. ठरविलेले काम झाले का, या सर्वांविषयी आढावा घेऊन दुसर्या दिवसाचे नियोजन करणे, अशा प्रकारे कामकाज केले जात आहे.
सूक्ष्म सर्वेक्षण करून नियोजनामध्ये रुग्णांचा आरोग्य केंद्रनिहाय आढावा ठेवला जातो. याशिवाय प्रत्येक सेक्टर, प्रत्येक इमारतनिहाय वस्तुस्थितीदर्शक आकडेवारीसह अहवाल तयार करण्यास सुरुवात केली आहे. या अहवालामुळे कोणत्या इमारतीमध्ये, कोणत्या सेक्टरमध्ये व कोणत्या नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरात रुग्ण वाढत आहेत. कोणत्या वयोगटातील रुग्ण वाढत आहेत. मृत्यूचे प्रमाण कोठे व कोणत्या वयोगटातील जास्त आहे याची दैनंदिन आकडेवारी तयार करून त्यावर अभ्यास करून उपाययोजना करण्यास सुरुवात केली.
100 जणांची नियमित ऑनलाइन मीटिंग
कोरोनाला रोखण्यासाठी नवी मुंबईत प्रत्येक सेक्टर व इमारतनिहाय रुग्णांची नोंद ठेवली जात आहे. आयुक्त अभिजित बांगर प्रतिदिन सायंकाळी तीन तास आढावा बैठक घेत असून त्यामध्ये सर्व नागरी आरोग्य केंद्रांचे डॉक्टर्स, आरोग्य अधिकारी, विभाग अधिकारी, नोडल अधिकारी मिळून जवळपास 100 जणांचा समावेश असून त्यांच्याकडून दिवसभरातील आढावा व दुसर्या दिवसाचे नियोजन केले जात आहे.