Breaking News

जिद्दीने करा मधुमेहाशी यशस्वी मुकाबला!

आरोग्य प्रहर

मधुमेह हा तसा लांब पल्ल्याचा आजार. त्यामुळे तो झाला की बराच काळ, कदाचित आयुष्यभरही तुम्हाला इलाज करून घ्यावा लागतो. वेळोवेळी कराव्या लागणार्‍या रक्त तपासण्या, उपचार, त्यातून कुठले इंद्रिय त्याच्या विळख्यात सापडले की त्यासाठी होणारा खर्च या सगळ्याचा हिशेब मांडला तर कित्येक देशांची अर्थव्यवस्था ढासळेल की काय अशी परिस्थिती आहे. शिवाय अपघात सोडले तर सगळ्यात जास्त पाय कापले जातात ते मधुमेहात, डोळे खराब होतात ते याच आजारात. आपल्या देशात याहून गंभीर समस्या आहे. आपल्याला मधुमेह कमी वयात होतो व त्यापासून हृदयरोगही ऐन तरुणपणात होतो, परंतु हा एक आजार असा आहे की जो टाळताही येऊ शकतो. त्यावर सुरुवातीलाच नीट नियंत्रण मिळवले तर तुमचे आयुष्य पुढची कित्येक वर्षे विनासायास, मधुमेहामुळे निर्माण होणार्‍या कुठल्याही प्रश्नाशिवाय जाऊ शकते.

तुम्ही तुमची शुगर संभाळलीत तर मधुमेह तुम्हाला काहीच त्रास देणार नाही. तुमच्या पालकांना मधुमेह असेल तर अगदी विशी-तिशीत रक्त तपासून घ्या. मधुमेह होणार असल्याची सगळ्यात पहिली खूण म्हणजे जेवणानंतरची शुगर 126 ते 140 दरम्यान येणे. याचा अर्थ तुम्ही मधुमेहाच्या उंबरठ्यावर आहात.

नियंत्रण शक्य

मधुमेह नियंत्रणासाठी प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. त्यासाठी डॉक्टरांना भेटा. उगीच कुणीतरी सांगितले म्हणून पावडरी अथवा चूर्ण घेऊ नका. सुरुवातीला शुगर नियंत्रणात आणणे महत्त्वाचे असल्याने जे उपचार सिद्ध झाले तेच वापरा. मधुमेहाच्या निदानानंतर तत्काळ उपचार केल्यास फायदा होईल. मधुमेहावरील औषधे अगदी सुरक्षित आहेत. त्यांनी मूत्रपिंड वगैरे निकामी होत नाही. अमुक औषधाने मधुमेह पूर्ण बरा होतो, त्यानंतर तुम्ही साखरही खाऊ शकता, असे कुणी म्हणत असेल तर तो खोटे बोलतोय हे लक्षात घ्या. मधुमेहावर नियंत्रण राखता येते, पण तो नाहीसा करता येत नाही. तुम्ही तपासणी करण्यात, वेळेवर औषधे घेण्यात, एखादे लक्षण दिसलेच तर त्याचे निराकरण करून घेण्यात दिरंगाई केली नाही तर अगदी नॉर्मल माणसाइतके आयुष्य तुम्ही जगू शकता, तेही कुठल्याही प्रश्नाशिवाय.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply