Breaking News

अल्पवयीन मुलाची हत्या; सावत्र बापास बेड्या

पेण ः प्रतिनिधी

पेणमधील आंबेगाव आदिवासीवाडी येथील 10 वर्षांच्या मुलाचा मृतदेह 13 एप्रिल रोजी हेटवणे धरणात बुडालेल्या अवस्थेत सापडला होता. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती, परंतु पोलिसांना मृत्यूप्रकरणी संशय आल्याने सुतावरून स्वर्ग गाठत पेण पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कलिंदर तडवी, पोलीस हवालदार चौरे यांच्या पथकाने शिताफीने आरोपी पोश्या दामा लेंडे (35) याला या प्रकरणी अटक केली आहे.

13 एप्रिलला पोलिसांना पेणमधील हेटवणे धरण येथे एका 10 वर्षीय मुलाचा मृतदेह बुडालेल्या अवस्थेत आढळला. मृतदेह आंबेगाव आदिवासीवाडी येथील अल्पवयीन मुलाचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याचा तपास सहाय्यक फौजदार कलिंदर तडवी यांच्याकडे सोपविण्यात आला होता. 20 एप्रिलला मयत मुलाचे मामा संजय वाघमारे व समीर वाघमारे यांना जबाबासाठी बोलाविण्यात आले. या वेळी मयत मुलाचा सावत्र बाप पोश्या दामा लेंडी (रा. दाभाची वाडी, वरसई, पेण) हा त्याच्या आईला भेटण्यास अलिबाग येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली.

या प्रकरणी पोश्या लेंडीभोवती संशयाची सुई फिरत असल्याने पोलीस निरीक्षक गौरीशंकर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील, सहाय्यक फौजदार कलिंदर तडवी, पोलीस हवालदार चौरे यांनी तपासास सुरुवात केली. पोलिसांनी काही दिवस संशयित आरोपी पोश्या लेंडीच्या हालचालींवर नजर ठेवली. त्यानंतर आरोपीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर पोलिसी खाक्या दाखविताच आपणच अल्पवयीन मुलास स्वतःच्या गाडीवर नेऊन त्याला धरणात फेकून देऊन त्याचा खून केल्याचा कबुलीजबाब त्याने पोलिसांना दिला.

या गुन्ह्यातील आरोपीस 6 मे रोजी अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात पेण पोलीस ठाण्यात गु. र. नं 74/2021 भा. दं. वि. कलम 302प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस पेण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 13 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे करीत आहेत.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply