100 टक्केलसीकरण; 18 ते 44 वयोगट मात्र लसीकरणापासून वंचित
पोलादपूर ः प्रतिनिधी
तालुक्यातील कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. पैठण ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष मोरे यांनी सतर्कता बागळून पितळवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 45 वर्षांवरील ग्रामस्थांना कोविड लसीकरणासाठी नेले. या कामामुळे पोलादपूर तालुक्यातील पहिली 100 टक्के लसीकरण करणारी ग्रामपंचायत होण्याचा मान पैठण ग्रामपंचायतीने मिळविला आहे, मात्र पोलादपूर तालुक्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लसीकरणाचे केंद्र पोलादपूर तालुक्यात नसल्याने या केंद्राची नितांत गरज असून याअभावी या वयोगटातील सर्वच नागरिक लसीकरणापासून वंचित राहिले आहेत.
पैठण गावचे विद्यमान सरपंच संतोष मोरे यांनी त्यांच्या गावातील ग्रामस्थांना सोबत घेऊन कोरोनावर मात करण्यासाठी शासनाने वेळोवेळी केलेल्या सूचनांची माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहचवून जनजागृती केली आहे. ग्रामस्थांच्या सहकार्याने आवश्यक असेल तेव्हा मुंबई, पुणे व स्थानिक ग्रामस्थांसोबत चर्चा विचारविनिमय करून काही कठोर निर्णयदेखील या काळात घेतले आहेत. पैठण गावातील वयोवृद्ध आणि गरीब कुटुंबांना या आजारापासून दूर ठेवण्यासाठी लसीकरण करून घेणे गरजेचे असल्याचे ग्रामस्थांना समजावून सांगितले. याकामी सरपंच संतोष मोरे यांना राकेश सावंत, अंकुश मोरे, अमोल मोरे, सुभेदार बबन मोरे, वसंतराव येरूणकर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक शिक्षक, ग्रामपंचायत कर्मचार्यांनी वाहतुकीची सुविधा नसतानादेखील ग्रामस्थांना एकत्रित करून पितळवाडीतील लसीकरण केंद्रापर्यंत घेऊन जाण्याचे बहुमोल कार्य केले.
कोरोना संसर्गाच्या भीतिदायक वातावरणातही डॉ. गुलाबराव सोनवणे, डॉ. सोपान वागतकर, डॉ. श्रद्धा सुर्वे, प्राथमिक आरोग्य केंद्र पितळवाडी येथील सर्व कर्मचार्यांनी सामंजस्याची आणि सहकार्याची वागणूक पैठण ग्रामस्थांना दिल्याबद्दल सरपंच संतोष मोरे यांनी सर्वांना धन्यवाद दिले. डॉ. सोपान वागतकर यांनीही सरपंच संतोष मोरे यांनी सातत्याने पाठपुरावा करून सुयोग्य नियोजन करीत पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण केंद्रामध्ये येऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून सहकार्य केल्यामुळेच सर्व पैठण ग्रामस्थांना लसीकरणाचा पहिला डोस देणे शक्य झाले असून पोलादपूर तालुक्यातील पैठण हे पहिले गाव 100 टक्के लसीकरण करण्यात यशस्वी झाले. कोविडच्या लसीकरणाच्या दुसर्या डोससाठीही पितळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राकडून पैठण ग्रामस्थांना असेच सहकार्य मिळेल, अशी ग्वाही दिली.
पोलादपूर तालुक्यातील 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोविशिल्ड अथवा कोवॅक्सिन लसीकरणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालयामध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे पोलादपूर तालुक्याची मोठी लोकसंख्या या लसीकरणापासून वंचित राहणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. दरम्यान, पोलादपूर तालुक्यात 45 वर्षांवरील नागरिकांना लसीकरणाची केंद्र कार्यरत असताना 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना लसीकरण करण्यास ही केंद्र प्रशासनाला का उपयुक्त वाटत नसावीत, असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला आहे.