आपल्या उंचीने पर्यटकांना आकर्षित करणारे माथेरानमधील घोडे मार्च 2020 पासून वेगळ्याच समस्येत जीवन जगत आहेत. वाहनांना बंदी असलेल्या माथेरानमध्ये घोडा हेच वाहतुकीचे एकमेव साधन आहे. घोड्यावरून रपेट मारण्यासाठी, घोडा पळविण्याचे तंत्र शिकण्यासाठी आणि येथील 100 टक्के वनराईने भरलेल्या निसर्गाच्या सानिध्यात राहून आपल्या शरिरात ऑक्सिजन घेण्यासाठी पर्यटक माथेरानला येत असतात. या माथेरानची आर्थिक स्थिती लॉकडाऊनमुळे नाजूक झाली आहे. त्या आर्थिक परिस्थितीमुळे घोड्यांच्या चार्याचा प्रश्न गेली सव्वा वर्षे वेगळ्या पद्धतीने उभा आहे.
थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान हे पूर्णपणे प्रदूषण मुक्त आहे. या प्रदूषणमुक्त वातावरणाचा आनंद घेण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक माथेरानला भेट देत असतात. येथील रहिवाशांचा आर्थिक गाडा हा पूर्णपणे पर्यटन व्यवसायावरच अवलंबून आहे. पर्यावरण संवेदनशील क्षेत्र असल्याने माथेरान पूर्णपणे वाहन मुक्त आहे. येथे येणार्या पर्यटकांवर येथील घोडेवाले, हातरिक्षावाले, हॉटेल चालक यासह येथे छोटेमोठे उद्योग करणारे सर्वच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. उन्हाळी सुट्टी, पावसाळा, दिवाळी, ख्रिसमस, नवीन वर्ष हे येथील पर्यटन हंगाम. यापैकी उन्हाळी सुट्टी व नवीन वर्ष हे येथील मुख्य पर्यटन हंगाम आहे. मात्र मागील वर्षी भारतात दाखल झालेल्या कोरोना या विषाणूला थोपवण्यासाठी शासनाकडून लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यात माथेरानचा पर्यटन हंगाम पूर्ण निघून गेला. त्यामुळे येथील आर्थिक घडी पूर्णपणे विस्कटली गेली. मिशन बिगिन सुरु झाले त्यानंतर माथेरान पुन्हा कामाला लागले. मात्र मागील काही दिवसात पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढू लागला आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढू लागल्याने शासनाकडून कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी मिशन ब्रेक दि चेन सुरु करण्यात आले. त्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी, कडक निर्बंध जाहीर झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी माथेरानकडे पाठ फिरवली आहे. त्याचा मोठा फटका येथील पर्यटनावर अवलंबून असलेल्या अश्व व अश्वपालकांनादेखील बसला आहे. पर्यटकच नाहीत, तेव्हा घोडे सांभाळायचे कसे? त्यांची भूक कशी भागवायची? असे प्रश्न अश्वपालकांसमोर उभे राहिले होते. मात्र आता प्राणीप्रेमींकडून अश्वापलकांना मदतीचे हात पुढे येत आहेत.
लॉकडाऊनमुळे यावर्षीदेखील माथेरानमधील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे येथील घोड्यांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झाला होता. घोडेस्वारीसाठी माथेरानमध्ये अनेक गर्भश्रीमंत आणि हौशी पर्यटक नियमित येत असतात. त्यातील अनेकांचे स्थानिक अश्वचालकांसोबत घरोब्याचे संबंध निर्माण झाले आहेत. त्यात अनेक सिनेकलावंतही आहेत. त्यामुळे ज्या ज्या वेळेला अश्वचालकांना मदतीची गरज भासते, तेव्हा हे अश्वप्रेमी मदतीसाठी स्वतःहून पुढे येत असतात. माथेरानमधील घोड्यांना चारा व खाद्याची गरज आहे, असे आवाहन येथील अश्वपाल संघटनेने करताच त्यांच्याकडून मदतीचा ओघ सुरु झाला. मात्र त्याचवेळेस दस्तुरीनाका येथे व्यवसाय करीत असलेल्या मूळवासीय अश्वपाल संघटनेनेही असेच आवाहन केले. त्यामुळे त्यांच्याकडेही अश्वखाद्याची मदत पोहचली. दोन्ही संघटनांना वेगवेगळ्या दानशूर व्यक्तींकडून मदतीचा ओघ सुरू आहे. या संघटना आपापल्या सभासदांना भुसा व चारा वाटप करीत होत्या. मात्र आता वाटपासाठी आलेल्या भूशाच्या गोणींवरुन दोन्ही संघटनांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे.
दोन्ही संघटनांनी भुसा वाटपामध्ये घोळ केला जात असल्याचे आरोप एकमेकांवर केले आहेत.
घोड्यांचे आरोग्य
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या माथेरानमध्ये वाहनाला बंदी आहे. येथे हातरिक्षा, घोडे व ट्रेन यांनी प्रवासी वाहतूक केली जाते. तर माल वाहतुकीसाठी हातगाडी, घोडे यांचा वापर केला जातो. एमएमआरडीए मार्फत माथेरान नगर परिषद हद्दीत अनेक विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी सामानाची वाहतूक करायला घोड्यांचा वापर होत आहे. येथे सुमारे 500 ते 600 घोड्यांच्या पाठीवरून सामान वाहून नेले जात आहे. या कामात जखमी घोड्यांचाही वापर होत आहे.
या प्रकारामुळे घोड्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. कित्येक घोड्यांना वेळेवर पोटभर खाद्य व पाणी मिळत नसल्याने मालवाहतूक करण्यासाठी वापरलेले घोडे अर्ध्या रस्त्यात पडत आहेत. हिच परिस्थिती कायम राहिल्यास भविष्यात घोड्यांपासून होणार्या ग्लेंडरसारख्या महाभयंकर आजारांचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाहेरील घोड्यांसोबत सरा या रोगाची साथ येऊन माथेरानमधील घोडे बाधीत होऊ नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
महाजन ट्रस्टची अनोखी शक्कल
माथेरानमधील अश्वखाद्यबाबत मुंबईतील समस्त महाजन ट्रस्टने अनोखी शक्कल लढवली आहे. माथेरानमधील शरलोट किंवा सिमसन तलावातील गाळ काढण्यासाठी श्रमदान करणार्याला प्रतिदिन एक बॅग भुसा किंवा जीवनावश्यक वस्तूचे किट देण्याचे ट्रस्टने जाहीर केले आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येऊन उदरनिर्वाह करणेही सोपे जाईल. तसेच माथेरानच्या डम्पिंग ग्राऊंडवर गायरान तयार केल्यास घोड्यांच्या चार्याचा प्रश्न सुटू शकतो, असे समस्त महाजन ट्रस्टने सुचविले आहे. माथेरानच्या जंगलामध्ये फिरून पडलेल्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्या गोळा करून नगरपालिकेकडे दिल्यास पर्यावरणाचे रक्षणही होऊ शकते, ही कामे करणार्यांना मदत करण्याचे ट्रस्टने आश्वासन दिले आहे. जंगलातील प्लास्टिकबाबत नगर परिषदने पुढाकार घेतल्यास माथेरानचे जंगल अधिक सुंदर दिसेल, असा विश्वास समस्त महाजन ट्रस्टने व्यक्त केला आहे.
-संतोष पेरणे, खबरबात