पशुसंपत्ती पशुसंवर्धन विभागाचे आर्थिक योगदान
कर्जत : बातमीदार
लॉकडाऊनच्या काळात माथेरानमधील पर्यटन व्यवसाय थांबल्याने तेथील घोड्यांच्या खाद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाचे विभागीय सहआयुक्त डॉ. सुभाष म्हस्के आणि त्यांचे सहकारी काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मुक्या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी सरसावले आहेत. त्यांनी दोन हजार किलो अश्वखाद्य माथेरानमध्ये उपलब्ध करून दिले आहे.
माथेरानमध्ये सुमारे 450 घोड्यांचा वाहतुकीसाठी वापर केला जातो. या घोड्यांसाठी गोदरेज कंपनीचे दोन हजार किलो पौष्टिक अश्वखाद्य वाटपासाठी पुरविण्यात आले आहे. पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. सुभाष म्हस्के यांच्या उपस्थितीत डॉ. जयराम रमणी, डॉ. विष्णू काळे, डॉ. किसन देशमुख यांनी हे अश्वखाद्य अश्वमेघ हॉर्स युनियनच्या अध्यक्षा आशा कदम व अश्वपालक यांच्याकडे सुपूर्द केले. हे खाद्य पुरविण्यासाठी आलेला खर्च पशुसंवर्धन विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचार्यांनी स्वेच्छेने वर्गणी जमा करून केला.
पशुसंवर्धन विभागाकडून मुक्या प्राण्यांवरील उपचार व लसीकरणाची काळजी घेण्यात येत आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत. लॉकडाऊनच्या काळात मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात वारंवार स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे तसेच ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी असल्यास तात्काळ नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन वैद्यकीय सल्ला घेण्याबाबतच्या सूचना या वेळी पशुसवंर्धन विभागाकडून देण्यात आल्या.
रायगड जिल्ह्यातील गाई, बैल व वासरे इत्यादी प्राण्यासाठी चारा-पाण्याची व्यवस्था सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. भविष्यातही मुक्या प्राण्यांची उपासमार होणार नाही, त्यांना योग्य ते उपचार मिळावेत, यासाठी पशुसंवर्धन विभाग सदैव प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही डॉ सुभाष म्हस्के यांनी या वेळी दिली.