Breaking News

आत्मतेजातून फुललेला कल्पवृक्ष

जिद्द, दूरदृष्टी, आत्मविश्वास, परिस्थितीवर स्वार होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती, परिश्रम करण्याची अमर्याद क्षमता या सार्‍या गोष्टींच्या एकत्रित समुच्चयाचे नाव म्हणजे मा. रामशेठ ठाकूर होय. माणसाला गाठता येणे शक्य असलेले सगळे मोठेपण गाठणे आणि त्याच वेळी आपले पाय मात्र जमिनीत घट्ट रोवून आपल्या लोकांच्यात राहणे ही कठीण गोष्ट ठाकूरसाहेबांनी त्यांच्या आयुष्यात अगदी लीलया साध्य केली आहे. समोरच्याची गुणवत्ता त्याच्या सगळ्या क्षमतांसह क्षणार्धात जोखण्याचे, त्याच्या विकास व वाढीला मनापासून प्रोत्साहन देण्याचे आणि त्याचवेळी त्याला आपल्याशी जोडून घेण्याचे कौशल्य हाच ठाकूरसाहेबांचा स्थायीभाव आहे.

आज काळ बदलला आहे. नैतिक मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. मानसिक असमाधान, चंगळवाद यामुळे माणूस पथभ्रष्ट होत चालला आहे. अशा या अंधारयुगात ‘मी कोण? मी कुठून आलो? कुठे जाणार?’ या आदिम प्रश्नांमधील मर्म ज्यांना समजले ते असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे मा. रामशेठ ठाकूर हे होत. संपत्तीचा मोह त्यांना कधीच वाटत नाही. भौतिक सुखाच्या मागे त्यांचे मन आसक्त होत नाही. देण्यासाठी त्यांची मूठ कायमच उघडी आणि झुकलेली असते. या वर्तनाने माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची नैतिक उंची आपोआपच वाढत असते.

आपल्या प्रवासाचा प्रारंभ, त्या प्रवासातील काट्याकुट्यांचे रस्ते, खाच-खळगे यांचे दाहक अनुभव गाठीशी बांधून स्वकर्तृत्वावर पुढे आल्यानंतर मागे वळून आपल्यासारखेच अनुभव घेत असलेल्यांचा मार्ग सुकर करण्याची दुर्दम्य इच्छा एखाद्याच्या ठायी उत्पन्न होते, तेव्हा त्या माणसाने ‘माणूस’ म्हणून खरी उंची गाठलेली असते. हे मोठेपण मी रयत परिवाराचा घटक झाल्यापासून असंख्य वेळा अनुभवलेलं आहे. असाच एक प्रसंग खासकरून माझ्या मनात घर करून राहिलेला आहे तो म्हणजे कर्मवीर अण्णांच्या स्मृतिदिनाचा. 9 मेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गेली अनेक वर्षे मी करत आलो आहे. अण्णांच्या स्मृतिदिनी संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवारसाहेब व सर्व पदाधिकारी एकत्र येऊन संस्थेच्या पुढील शैक्षणिक वाटचालीचे धोरण निश्चित करत असतात. शिक्षणातील नवे प्रवाह, नवतंत्रज्ञानाचा वापर संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये कसा करता येईल यासाठीचा ऊहापोह यानिमित्ताने होत असतो. मला आठवतंय थोर गांधीवादी विचारवंत ध्यासपर्वकार कै. रावसाहेब शिंदे त्यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष होते. मा. पवारसाहेब आणि रावसाहेब यांच्यामध्ये कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्यासाठी तळमळीने चर्चा झाली. पण या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उभा करावा लागणार होता. कार्यक्रमाच्या दिवशी मंचावर पवारसाहेबांनी थेट भाषणात रामशेठ ठाकूर, तुम्ही एक कोटी रुपये द्या, अशी मागणी केली. पवारसाहेबांच्या तोंडून हे वाक्य निघाल्याबरोबर ठाकूरसाहेबांनी क्षणाचाही विलंब न करता ‘दिले’ एवढाच शब्द काढला. त्यावेळी उपस्थितांनी अचंबित होऊन वाजवलेल्या टाळ्यांचा मी साक्षीदार आहे.

ही गोष्ट एकदाच घडली असे नव्हे, जेव्हा जेव्हा रयतेच्या कुठल्याही कार्यासाठी निधीची गरज निर्माण झाली तेव्हा तेव्हा  दातृत्व सर्वांनीच अनुभवले आहे. महाभारतातील कर्ण कथेचे हे आधुनिक काळातील वास्तवातील रूपआहे असेच मला नेहमी वाटत आले आहे. जीवन आणि कार्याकडे जेव्हा आपण पाहतो तेव्हा त्यांच्या जीवनातील सिद्धांताची पक्की बैठक आपले लक्ष वेधून घेते. कर्मवीर अण्णा आणि वहिनींचे प्रतिबिंब सातत्याने ठाकूरसाहेबांच्या  जीवनात उमटलेले दिसते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या पहिल्या दशकात ठाकूरसाहेबांचे बालपण गेले. खरेतर तो सबंध कालखंड महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उत्थानाचा कालखंड होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सामाजिक क्रांतीची बीजे पेरून ठेवली होती. लोकराजा राजर्षी शाहूंनी समतेचे शिंपण करून अनुकूल वातावरणाची निर्मिती केली होती. ठाकूरसाहेबांचा जन्म झाला तो 2 जून 1951 रोजी. त्याच्या वर्षभरच अगोदर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीतून संविधानाच्या रूपाने तयार झालेला स्वातंत्र्य, समता, न्याय- बंधुभावाचा जाहीरनामा पारित करण्यात आला होता. त्याच्याही अगोदर 1919 मध्ये महात्मा फुले यांच्या आदर्शावर कर्मवीर अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात शैक्षणिक जागृतीच्या चळवळीने जोर धरला होता. अस्तित्वशून्य बहुजन समाजाचे स्वत्व जागे होत होते. कसलीही सामाजिक पार्श्वभूमी नसलेल्या, दारिद्य्राने पिचून गेलेल्या समाजाला ज्ञानाचे महत्त्व पटू लागले होते. खेड्यापाड्यात चावडीवर आणि मारुतीच्या मंदिरात भरणार्‍या रयतेच्या शाळा बहुजनांना आपल्या वाटू लागल्या होत्या.

याच काळात कुलाबा जिल्ह्यातील (आजचा रायगड जिल्हा) पनवेल भागात असणार्‍या न्हावेखाडी, गव्हाण भागात ठाकूर साहेबांचे  वडील चांगू काना ठाकूर व मातोश्री भागूबाई कमालीच्या दारिद्य्रात जीवन जगत होते. पण त्यांच्या जीवननिष्ठा प्रामाणिक व प्रबळ होत्या. सत्याने वागावे, कष्ट करावे, स्वत:वर भरोसा ठेवावा, जीवनाचे हे साधे-सोपे तत्त्वज्ञान अंगीकारलेल्या या दाम्पत्याने परिस्थितीचे अवडंबर केले नाही. जिद्द, चिकाटी आणि धैर्याने संघर्षाचा मार्ग अवलंबला. त्याकाळी पनवेल भाग व्यापाराचे केंद्र होता. तांदूळ, मीठ, मासे यांची जहाजावाटे वाहतूक होत असे. जहाजावर साहित्याची चढ-उतार करताना खाडीच्या काठावर जहाजातून खाली पाण्यात सांडलेले धान्य गोळा करावे, ते वाळवावे आणि त्याचा स्वयंपाक करून पोटाची आग विझवावी असे प्रसंग अनेकदा कुटुंबावर आले होते. त्या काळात सुरू असलेल्या रेल्वेच्या कामावर रोजंदारीने जाणे, कधी जंगलातून लाकडाच्या मोळ्या आणणे व विकणे, पडावामध्ये डुबक्या मारून रेती काढणे, मासळीसाठी दिवसदिवस खाडीच्या काठावर बसून राहणे अशी कामे ठाकूरसाहेबांच्या वाट्याला लहानपणी आली होती. या संघर्षमय दिवसातही न्हावेखाडीच्या जीवन शिक्षण मंदिरात ठाकूरसाहेबांनी निष्ठेने बाराखडी गिरवली. पुढे रयत शिक्षण संस्थेने 1963 साली गव्हाण येथे सुरू केलेल्या माध्यमिक शाळेत ठाकूरसाहेबांनी प्रवेश घेतला. रयत शिक्षण संस्थेच्या कार्याशी त्यांची झालेली ही पहिली ओळख होती. कर्मवीर अण्णांच्या विचारांचा तो पहिला संस्कार होता. आपल्यासारख्याच महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातील असंख्य गोरगरीब मुलांना कर्मवीरांच्या वटवृक्षाच्या छायेत आसरा मिळत आहे या जाणिवेने ठाकूरसाहेबांचे बालमन हरखून गेले. आमुलाग्र जीवन परिवर्तनाची ताकद रयतेच्या संस्कारात होती. बहुजन समाजाची पहिली शिक्षित फळी रयत शिक्षण संस्थेमुळेच निर्माण झाली हा इतिहास आहे. घालायला कपड्यांचे जेमतेम दोन जोड, जुनी बायडिंग केलेली वह्या-पुस्तके अशा परिस्थितीत ठाकूरसाहेबांचे माध्यमिक शिक्षण सुरू होते. जितकी प्रतिकूल परिस्थिती तितकीच ज्ञानार्जनाची प्रबळ जिद्द असा  प्रवास सुरू होता. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढे काय? असा प्रश्न निर्माण झाला. पनवेल भागात कुठेही त्यावेळी कॉलेज नव्हते. शिक्षणासाठी घर सोडून बाहेर पडणे क्रमप्राप्त होते, पण जायचे कुठे?’ हा प्रश्न होता. गव्हाणच्या शाळेत सातार्‍यात सुरू असणार्‍या छ. शिवाजी कॉलेज आणि कमवा शिका योजनेबद्दल ठाकूरसाहेब ऐकून होते. पण तिथवर पोहोचण्याचा मार्ग सापडत नव्हता. दरम्यान, त्याच भागातील एस. बी. पाटील नावाच्या शिक्षणासाठी सातार्‍याला असणार्‍या विद्यार्थ्याशी ठाकूरसाहेबांची ओळख झाली आणि त्याच्याबरोबर ते सातार्‍याला आले.

ठाकूरसाहेबांचे शिक्षणासाठी सातार्‍याला येणे हा त्यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा होता. स्वावलंबी शिक्षणातून सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग ठाकूरसाहेबांना मिळाला तो छत्रपती शिवाजी कॉलेजच्या कमवा आणि शिका योजनेतून. कर्मवीरांचे समतानिधिष्ठ समाज निर्मितीचे तत्त्वज्ञान पुढे आयुष्यभर राजकारण आणि समाजकारणात ठाकूरसाहेबांना मार्गदर्शक ठरले. कर्मवीर अण्णांच्या सहवासात घडलेली आणि वाढलेली तत्त्वनिष्ठ शिक्षकांची फळी त्यावेळी सातार्‍याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये बहुजन उत्थानाचे कार्य करत होती. प्राचार्य शंकरराव उनउने, आर. डी. गायकवाड, प्रा. श्रीधर हेरवाडे अशी उमदी शिक्षक मंडळी साहेबांच्या शैक्षणिक विकासाला कारणीभूत ठरली. अर्थात बालपणीच्या म्हात्रे गुरुजींच्या आठवणीने ठाकूरसाहेबांना आजही गहिवरून येते.

प्रा. शिवाजीराव भोसले यांची व्याख्याने ऐकण्यासाठी महाविद्यालयीन जीवनात कराड, कोल्हापूर असा प्रवासही ठाकूरसाहेबांनी केला. आपला बहुजन समाज, त्याची परिस्थिती, सामाजिक संघर्ष यातून ठाकूरसाहेबांची सामाजिक जाणीव प्रगल्भ होत गेली. रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कार्याला असलेले नैतिक मूल्यांचे अधिष्ठान आणि बहुजन उत्थानाचे तत्त्वज्ञान यामुळे आपणही शिक्षणक्षेत्रात जावे अशी भावना ठाकूरसाहेबांच्या मनात येऊ लागली. त्यामुळे पुढे बी.एड. करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

1973 मध्ये बी.एड. पूर्ण केल्यानंतर ठाकूरसाहेब पनवेलला परत गेले. विठोबा खंडाप्पा हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम करण्याची त्यांना संधी मिळाली. तेथे वर्षभर काम केल्यानंतर पुढे वाशी इथल्या न्यू बॉम्बे स्कूलमध्ये 1976 पर्यंत त्यांनी काम केले. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून निष्ठापूर्वक घेतलेले शिक्षण, रयत शिक्षण संस्था आणि कर्मवीरांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव यामुळे शिक्षण क्षेत्रात ठाकूरसाहेबांचे मन रमले. प्रयोगशील आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी अल्पावधीतच त्यांची ओळख निर्माण झाली. दरम्यान आपण सक्षम व्हावे. समाजाला सक्षम करावे. काहीतरी रचनात्मक कार्य उभे करावे असा विचार मनात येत होता. पत्करलेली नोकरी याकामी अपुरी पडेल या जाणिवेतून हळूहळू ठाकूरसाहेबांनी उद्योग व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. याच काळात आधुनिकतेची चाहूल लागलेले मुंबई शहर हळूहळू विस्तारत होते. परिस्थिती बदलत होती. प्रारंभी दहा-बारा हजार रुपयांची मिळणारी कामे प्रामाणिकपणे व निष्ठेने केल्यामुळे पुढे कामांचा व्याप वाढत वाढत कोट्यवधीपर्यंत गेला. अर्थचक्र फिरू लागले. रोजगारनिर्मिती होऊ लागली. समाजात वलय निर्माण झाले. उद्योग व्यवसायात स्थिरावल्यानंतर पनवेल भागातील बदललेल्या राजकीय परिस्थितीत ठाकूरसाहेबांना राजकीय भूमिका घेणे अपरिहार्य बनले.

रायगड जिल्ह्यावर स्वातंत्र्यानंतर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचा प्रभाव होता. अगदी कळते झाले तेव्हापासून त्यांच्या आजूबाजूला शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचेच लोक होते. त्यातच दि. बा. पाटील, डॉ. एन. डी. पाटील यांच्याबरोबरच जनार्दन भगत या प्रबळ नेत्यांचा संपर्क ठाकूरसाहेबांशी आला. जनार्दन भगत यांच्या कन्येशीच पुढे ठाकूरसाहेबांचा विवाह झाला. भगतसाहेबांना आपल्या जावयाचा अभिमान वाटे. भगतसाहेब राजकीयदृष्ट्या डाव्या विचारांचे आणि बहुजननिष्ठ राजकारणाचा पुरस्कार करणारे होते. कष्टातून मेहनतीने सातार्‍याला जाऊन शिक्षण घेतले याचे भगतसाहेबांना कौतुक होते. त्यांच्या दिवाणखान्यात साहेबांचा दीक्षांत समारंभातील पदवी स्वीकारतानाचा फोटो लावलेला होता.

भगतसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाकूरसाहेबांची राजकीय जडणघडण झाली. एका अर्थाने भगतसाहेब आज ठाकूरसाहेबांचे राजकीय गुरू होत. ठाकूरसाहेबांच्या जीवनात अनेक राजकीय स्थित्यंतरे घडली. अनेक उलथापालथी झाल्या. लोकहित नजरेसमोर ठेवून त्यांना अनेकदा वेगळे निर्णय घ्यावे लागले, परंतु पनवेल, उरण आणि रायगड भागातील लोकांच्या विकासाच्या विचारांवर त्यांची निष्ठा होती. या सामान्य लोकांशी त्यांची बांधिलकी होती. वेगळ्या राजकीय भूमिका घेतानादेखील त्यांनी लोकहितालाच अधिक प्राधान्य दिले. कोणतीही राजकीय आश्वासने आणि प्रलोभने आजवर ठाकूरसाहेबांना विचलित करू शकली नाहीत. हेच त्यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य होय.

राजकारणापेक्षा आपल्या मूळ शिक्षकी पेशात आणि रचनात्मक कार्यातच त्यांचे मन अधिक रमले ही गोष्ट सहज ध्यानात येण्यासारखी आहे. आपली मातृसंस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेविषयी वेगळा जिव्हाळा आणि प्रेम त्यांच्या मनात सदैव जागरूक राहिले आहे. अक्षरश: कोट्यवधी रुपयांचा निधी, देणग्या रयत शिक्षण संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी ठाकूरसाहेब देत आले आहेत. या कार्याच्या पाठीमागे त्यांची निस्वार्थ भावना आणि नि:स्पृह वृत्ती जाणवत आली आहे.

पनवेल भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ठाकूरसाहेबांनी 1997 साली जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या माध्यमातून ज्यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपल्या पंखांना बळ दिले, आपल्याला उभे केले त्या आपल्या वडिलांच्या नावे चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, न्यू पनवेलची स्थापना केली. वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असणार्‍या देखण्या इमारती, आधुनिक शिक्षण, नवनवे अभ्यासक्रम, हेल्थ सेंटर अशा सर्व सोयींनी युक्त असलेले सी.के.टी. कॉलेज ठाकूरसाहेबांच्यातील प्रयोगशील शिक्षकाच्या सृजनाचे प्रतीक बनले आहे.

मुंबई विद्यापीठाने विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सुमारे सत्तर महाविद्यालयांची पाहणी करून न्यू पनवेलच्या या चांगू काना पाटील महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालयाचे प्रमाणपत्र देऊन गौरविले आहे. नॅक पुनर्मूल्यांकनाद्वारे महाविद्यालयाने सातत्याने ‘अ’ दर्जा प्राप्त केला आहे. असे एकही वर्ष नसते की मुंबई विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत सीकेटी कॉलेजचे विद्यार्थी नसतात. मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित केलेले ‘अविष्कार’ संशोधन महोत्सव असोत अथवा राष्ट्रीय सेवा योजनेचे उपक्रम सीकेटी कॉलेजचे नाव सातत्याने अग्रभागी असते.

ठाकूरसाहेबांनी स्वत:ची शिक्षण संस्था काढल्यानंतरही आपल्या मातृसंस्थेविषयीचे त्यांचे प्रेम आणि जिव्हाळा तिळमात्रही कमी झाला नाही. उलट रयत शिक्षण संस्थेच्या फुंडे, दापोली, जासई, पळस्पे वावंजे, रिटघर, कामोठे, उलवा, पनवेल, गव्हाण, दहिवडी, मलकापूर, रामानंदनगर, कुंभोज यांसारख्या अनेक शाखा आणि शैक्षणिक संकुलांना ठाकूरसाहेबांनी कोट्यवधींची मदत केलेली आहे. एकेकाळी रयत शिक्षण संस्थेने पालकाच्या रूपात उभे राहून ठाकूरसाहेबांची पाठराखण केली होती. आता याच भूमिकेतून ठाकूरसाहेब संस्थेसाठी उभे असतात याचा मनस्वी आनंद आहे.

ज्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये ठाकूरसाहेबांनी कमवा शिका योजनेतून शिक्षण घेतले त्याच महाविद्यालयात कोट्यवधी रुपये खर्चून आज उभे राहिलेले ‘लोकनेते रामशेठ ठाकूर भवन’ नव्या पिढीसाठी प्रेरणास्त्रोत झाले आहे. निष्ठा, जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या बळावर माणूस अमर्याद कर्तृत्व करू शकतो, आभाळाची उंची गाठू शकतो याची साक्ष देणारी ती देखणी इमारत आज दिमाखात उभी आहे. सर्व काही करून काहीच न केल्याच्या भावनेने जीवन जगणे ही साधी गोष्ट नव्हे. हा तर संतत्वाचा मार्ग आहे. ही तर योग्याची वृत्ती आहे. रामशेठ ठाकूरसाहेबांच्या अंगी ती वृत्ती आहे.

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यावर अढळ अशा प्रकारची श्रध्दा ठेवून अखंड रयतेसाठी काम करणारे लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब यांच्या भेटीचा पहिला प्रसंग तर माझ्या अंत:करणात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा एवढा अविस्मरणीय आणि विलोभनीय असा आहे. सन 2014चा तो दिवस आजही एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे माझ्या डोळ्यासमोरून तरळतो आहे. छत्रपती शिवाजी कॉलेज हे रामशेठ ठाकूरसाहेबांचे अत्यंत श्रध्देचे आणि जिव्हाळ्याचे ठिकाण. त्या वेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूरसाहेब होते. तेव्हा मी याच महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून काम करत होतो. त्यामुळे संस्थेचे कोणतेही काम अत्यंत जिव्हाळ्याने करायचे हा माझा नेहमीचा स्वभाव. आपल्या संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य आणि आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी लोकनेते रामशेठ ठाकूर कॉलेजला सदिच्छा भेट देण्यासाठी येणार आहेत. त्यापूर्वी मी रामशेठ ठाकूर यांच्याबद्दल खूप ऐकून होतो. त्यांची संस्थेवरील निष्ठा रयत शिक्षण संस्था हेच आपले आहे आणि या संस्थेसाठी तन, मन, धन अर्पण करून सेवा करणे हीच आपल्या जीवनातील खरी पूजा आहे. त्यांच्या दातृत्वाच्या कथा तर असंख्य, या भावनेने त्यांनी संस्थेत अनेक वर्षे काम केले आहे. मी प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर यांना विनंती केली की आपण साहेबांचे स्वागत जंगी स्वरूपात करू या. सकाळी नऊची वेळ असेल. महाविद्यालयाच्या कमवा व शिका योजनेतील विद्यार्थ्यांचे झांजपथक आम्ही कॉलेजच्या प्रांगणात बोलावून घेतले. गेटपासून प्राचार्य केबीनपर्यंत आमचे सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्या दुतर्फा रांगा उभ्या केल्या. रामशेठ ठाकूर गेटवर आले. गेटवरच बुके देऊन त्यांचे स्वागत झाले. त्या ठिकाणी त्यांना गाडीतून उतरण्याची आम्ही विनंती केली. स्वागत केले आणि झांजपथकाच्या निनादात आणि प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या गजरात त्यांना कॉलेजच्या गेटपासून प्राचार्य केबीनपर्यंत अत्यंत उत्साही वातावरणात आम्ही घेऊन गेलो. माझ्या जीवनातील एवढा विलोभनीय प्रसंग मी कधीच अनुभवला नव्हता, मात्र आभाळाएवढी उंची असणार्‍या या माणसाचे सामर्थ्य त्यांच्या नम्रतेतच दिसून येते. प्राचार्यांच्या केबीनमध्ये आम्ही गेल्यानंतर प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, मी स्वत:, आदरणीय रामशेठ ठाकूर आणि काही प्राध्यापक एकत्र बसलो होतो. प्राचार्य गणेश ठाकूरसाहेबांनी माझा परिचय त्यांच्याशी करून दिला आणि तो परिचय करून देत असताना हे डॉ. शिवलिंग, त्यांचे लेखन आणि वक्तृत्व इतरांना मोह घालणारे आहे. मेनकुदळे मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत अशा प्रकारची ओळख करून दिली. तेव्हा त्यांच्या मुखातून दोन शब्द बाहेर पडले ते आजही माझ्या कानात घोंगावतात. अहो, माझासुध्दा विषय मराठीच आहे. ते म्हणाले, आम्ही दोघे एकाच विषयाचे आहोत, मला अशा माणसांविषयी विशेष जिव्हाळा आहे, सर इकडे या, माझ्या जवळ बसा. त्यांनी मला बोलावून घेतले आणि त्यांच्या शेजारी असणार्‍या खुर्चीवर बसवले. अत्यंत जिव्हाळ्याने माझी कौटुंबिक विचारपूस केली. पार्श्वभूमी विचारली. ही माहिती सांगत असतानाच माझ्याकडून साहेब माझे संपूर्ण शिक्षण कमवा आणि शिका योजनेतून झाले आहे, असे सांगितले. तेव्हा त्यांनी माझ्या पाठीवर हात टाकून, अरे वा, आपण दोघे तर एकाच मार्गाचे प्रवासी आहोत, अशा शब्दांत माझा गौरव केला.

आजपर्यंत अशा प्रकारचा सन्मान पाच मिनिटांच्या ओळखीवर मी कधीच अनुभवला नव्हता. त्या क्षणापासून लोकनेते रामशेठ  ठाकूरसाहेब हे माझे प्रेरणास्थान झाले. याप्रसंगी ते आणखी एक वाक्य बोलून गेले की मी अत्यंत साधा. एवढा मोठा स्वागताचा सोहळा करण्याची काहीही गरज नव्हती. एवढेच नव्हे तर याच परिसरात मी ज्ञानाचे कण गोळा केलेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी कॉलेजची भूमी ही माझ्यासाठी तीर्थक्षेत्र आहे. माझ्याच या ज्ञानभूमीत अशा स्वागताची गरज नव्हती. आम्ही त्यांना सांगितले, साहेब आपण रयत शिक्षण संस्थेमध्ये जो आदर्श निर्माण केला आहे त्याबद्दलची ही कृतज्ञता आहे. हा सर्व प्रसंग आजही ठळकपणाने माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो.

याच छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रांगणातील आणखी एक प्रसंग सांगितल्याशिवाय मला पुढे जाता येत नाही. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर हे संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत होते. संस्थेच्या कामानिमित्त एक दिवस ते बाहेरगावी होते. सकाळी नऊ, साडेनऊची वेळ होती. मी कॉलेजला जाण्याच्या तयारीत होतो. प्राचार्य गणेश ठाकूरसाहेबांचा फोन आला. आदरणीय रामशेठ ठाकूरसाहेब  कॉलेजवर येत आहेत. मी संस्थेच्या कामासाठी बाहेरगावी आलो आहे. तुम्ही तातडीने कॉलेजवर जा आणि त्यांचे स्वागत आणि चहापानाची व्यवस्था करा. मी तात्काळ तयार झालो आणि दहा मिनीटात मी कॉलेजवर जातानाच बुके घेऊन गेलो. काही वेळात साहेबांची गाडी छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रांगणात आली. मी साहेबांचे स्वागत करण्यासाठी पुढे धावलो, साहेब, महाविद्यालयाच्या वतीने आपले मन:पूर्वक स्वागत असे औपचारिक स्वागत करून मी त्यांना प्राचार्यांच्या केबीनकडे घेऊन गेलो. मी त्याठिकाणी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. चहापान उरकल्यानंतर रामशेठ ठाकूरसाहेब मला म्हणाले, ‘सर मला कॉलेजचे ग्रंथालय पाहायचे आहे. आपण ग्रंथालयाकडे जाऊन येऊ या का?’ मी आमच्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल शिवाजी लोखंडे यांना कल्पना दिली की आम्ही दोन मिनिटात ग्रंथालयात येत आहोत, माझ्यासोबत आदरणीय रामशेठ ठाकूरसाहेब आहेत. आम्ही जेव्हा ग्रंथालयात पोहोचलो तेव्हा ग्रंथालयामध्ये असणारी पुस्तकांची संख्या, त्याठिकाणी चालणारे कामकाज, शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्वात मोठे ग्रंथालय म्हणून असणारा लौकिक, अत्यंत दुर्मिळ ग्रंथांचा असणारा संचय या सर्व घटकांची माहिती लोखंडे सरांनी आणि मी रामशेठ ठाकूरसाहेबांना दिली. मी या ठिकाणी शिक्षण घेत होतो. त्या काळातील ग्रंथालय आणि आजचे ग्रंथालय यामध्ये झालेला बदल त्यांनी आम्हाला सांगितला. कोणत्याही कॉलेजचे ग्रंथालय हा त्या कॉलेजचा आत्मा असतो. कॉलेजचे ग्रंथालय हे समृध्दच असायला पाहिजे. एवढे ग्रंथांवर प्रेम करणारे ठाकूरसाहेब मी पहिल्यांदा पाहिले. ग्रंथालय समृध्द होते, मात्र त्याठिकाणी अपुर्‍या असणार्‍या भौतिक सुविधा त्यांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. संपूर्ण ग्रंथालय पाहून झाल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेचे ग्रंथालय पाहण्याची इच्छा व्यक्त केली.

आम्ही ते ग्रंथालय पाहण्यासाठी गेलो. पश्चिम महाराष्ट्रातील एक आदर्श स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र म्हणून याचा लौकिक पसरला होता. स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ग्रंथालयात असणारी पुस्तके तेवढीच दुर्मिळ आणि उपयुक्त होती म्हणूनच या केंद्रातून शेकडो विद्यार्थी महाराष्ट्राच्या प्रशासकीय क्षेत्रात काम करत आहेत याचा मला अभिमान वाटतो, अशा भावना त्यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या. या ग्रंथालयाच्या पाहणीत तीन तासांचा वेळ कसा गेला हे आम्हालाही कळाले नाही. या दोन्ही ग्रंथालयांतून बाहेर पडताना रामशेठ  ठाकूरसाहेब मला म्हणाले, सर, या ग्रंथालयातील पुस्तके खूप महत्त्वाची आणि दुर्मिळ आहेत. या विद्यार्थ्यांना आणखी चांगल्या भौतिक सुविधा आपण दिल्या पाहिजेत. मी या दोन्ही ग्रंथालयांसाठी 20 लाख रुपये देतो. आपण ही ग्रंथालये आणखी चांगली करूया. ग्रंथालयातून बाहेर पडताना या महान व्यक्तीच्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द. आम्ही जेव्हा प्राचार्यांच्या केबीनपर्यंत पोहोचलो तेव्हा ते असे म्हणाले, सर, 20 लाखांऐवजी मी 40 लाख रुपये देतो. माझ्यासारख्या प्राध्यापकाच्या आनंदाला पारावर उरला नाही. अशा प्रकारचे शब्द साहेब म्हणून गेले आणि विशेष म्हणजे काही दिवसांत तो धनादेश कॉलेजमध्ये आला.

माझ्या जीवनात एखाद्या व्यक्तीने शिक्षण क्षेत्रावर एवढी श्रध्दा ठेवून काम केलेले मी कधीच पाहिले नव्हते. हळूहळू आमच्यामधील ऋणानुबंध अधिक घट्ट होत गेले. एवढ्या प्रचंड मोठ्या उंचीच्या माणसाने माझ्यासारख्या प्राध्यापकाला नावानिशी ओळखणे ही खूप मोठी गोष्ट आहे. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गोरगरीब मुलांना उच्च शिक्षण मिळावे, यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी कॉलेजची स्थापना केली. त्यामुळे या महाविद्यालयास पश्चिम महाराष्ट्रात एक वेगळे स्थान आहे. या महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात गुणवत्तेचे अनेक उच्चांक निर्माण केले आहेत. या महाविद्यालयात शिक्षण घेऊन सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, औद्यागिक आणि राजकीय क्षेत्रात आपला लौकिक प्राप्त केला आहे. याच शृंखलेतील संस्थेवर आणि शिक्षण क्षेत्रावर श्रध्दा ठेवून काम करणारी एक कडी म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर हे होय. सन 2017चा प्रसंग म्हणजे आपल्या मातृसंस्थेवर एखाद्या विद्यार्थ्याची किती भक्ती असू शकते याचे एक उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी कॉलेज सर्व तयारीनिशी नॅकच्या तिसर्‍या मूल्यांकनाला सामोरे जात होते. नॅक पिअर टिमच्या महाविद्यालय भेटीमध्ये लंच ऑन मिटींग होती. यामध्ये संस्थेचे प्रतिनिधी म्हणून रामशेठ ठाकूर उपस्थित होते. त्यांच्याबरोबर आ. पतंगराव कदमसाहेब, डॉ. अनिल पाटीलसाहेब ही मंडळी उपस्थित होती. लंच ऑन मिटींगच्या दरम्यान संस्थेचे शैक्षणिक कार्य, संस्थेने समाजासाठी दिलेले योगदान यासंदर्भात विस्ताराने चर्चा झाली. ही मिटींग संपल्यानंतर नॅक पिअर टीम माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी निघून गेली आणि महाविद्यालयाचे प्राचार्य, मी आणि रामशेठ ठाकूर महाविद्यालयाच्या प्रांगणात सहज फिरण्यासाठी गेलो. तेव्हा साहेबांना एक उणीव जाणवली आणि ती त्यांनी बोलून दाखविली. रामशेठ ठाकूर म्हणाले, आपले महाविद्यालयाचे स्पर्धा परीक्षा केंद्र एवढ्या चांगल्या पध्दतीने आपण चालवतो आहे तर या विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या भौतिक सुविधा आपण दिल्या पाहिजेत. चांगले लेक्चर हॉल, समृध्द ग्रंथालय, उत्कृष्ट दर्जाची अभ्यासिका आणि तज्ज्ञ मार्गदर्शक हे या विद्यार्थ्यांना देणे आपले काम आहे. तुम्ही असे करा महाविद्यालयाच्या परिसरात ज्याठिकाणी मोकळी जागा आहे, त्याठिकाणी चांगल्या इमारतीचे नियोजन करा. मी त्यासाठी 80 लाख रुपये देतो. साहेबांनी 80 लाख रुपये देण्याचे मान्य केल्यानंतर आम्ही इमारतीचे नियोजन केले. नियोजन करत असताना साहेबांकडून जेवढी आर्थिक मदत मिळेल तेवढ्यात बसेल एवढी इमारत बांधूया, पण नियोजन करत असताना पाच मजली इमारतीचे नियोजन करूया. हळूहळू त्या इमारतीचा विस्तार करता येईल असे नियोजन केले. रामशेठ ठाकूर यांच्यापुढे आम्ही त्या इमारतीचे बजेट आणि डिझायनिंग ठेवले. ते पाहिल्याबरोब साहेबांनी यासाठी मी एक कोटी 80 लाख देतो असे तत्क्षणी जाहीर केले. आपणास विशेष आश्चर्य वाटेल प्रत्यक्ष त्या इमारतीच्या पायाभरणीसाठी आम्ही जेव्हा एकत्र आलो तेव्हा प्राचार्यांनी रामशेठ ठाकूर यांना बांधकामाचे नियोजन सांगितले. सध्या आम्ही या एकूण डिझायनिंगमधील अर्धेच पूर्ण करणार आहोत. भविष्यात जसजसे पैसे येतील तसे आम्ही ती पूर्ण करणार आहोत. हे ऐकताच या महान दानशूर व्यक्तीने सहजपणे सांगून टाकले की, ङ्गसर, इमारत अशी अर्धवट बांधू नका, या इमारतीसाठी जेवढा खर्च येईल तो खर्च मी देईनफ. या इमारतीचे एकूण बजेट सुमारे सहा कोटी रुपये झाले. एका वर्षात ही टोलेजंग इमारत उभी राहिली. छत्रपती शिवाजी कॉलेजच्या वैभवात भर टाकणारी आणि विद्यार्थ्यांना सर्वोत्कृष्ट दर्जाच्या भौतिक सुविधा देणारी इमारत एका वर्षात पूर्ण झाली. एका हाताने दिलेले दान दुसर्‍या हातालासुध्दा कळू नये इतक्या सहजतेने या इमारतीचा कोट्यवधी रुपयांचा खर्च ठाकूरसाहेबांनी लीलया केला. आज त्या इमारतीमध्ये मीडिया आणि इंटरटेनमेंट आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट सुविधा पुरविण्यात आली आहे. संस्थेने त्यांच्याबद्दलची कृतज्ञता म्हणून त्यांची इच्छा नसताना आणि नाव देण्यासाठी त्यांचा विरोध असतानासुध्दा संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलमध्ये या इमारतीस लोकनेते रामशेठ ठाकूर भवन असे नाव देण्याचा ठराव केला. आज सातारा शहरातील आणि रयत शिक्षण संस्थेच्या अनेक महाविद्यालयांपैकी एक उत्तम दर्जाचे महाविद्यालय म्हणून शिवाजी कॉलेजकडे पाहिले जाते. याचे श्रेय रामशेठ ठाकूर यांना दिले तर ते अनुचित होणार नाही.

रामशेठ ठाकूर यांचा अनेकवेळा सहवास मिळाला. त्यांचे शैक्षणिक विचार ऐकावयास मिळाले, मानवी जीवनात नेमका आनंद कशात असतो याचा अर्थ मला कळाला. एकदा साहेबांना मी प्रश्न केला, ङ्गसाहेब, आपण एवढ्या उदार मनाने संस्थेच्या अनेक शाखांना आर्थिक मदतीसह सर्व प्रकारची मदत करत असता याच नेमकं गमक काय आहे?फ त्यावर साहेबांनी दिलेले उत्तर अत्यंत मार्मिक आहे. ते म्हणाले, ङ्गज्या समाजाने आपल्याला घडवले. आपल्यावर चांगले संस्कार केले, त्या समाजाचे आपण काही देणे लागतो. या जन्मात आपण जे कमवतो, ते अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि कष्टाने कमवतो. त्याच्यावर या समाजाचासुध्दा अधिकार आहे. ज्या संस्थेने माझ्यावर ज्ञानाचे संस्कार केले. याच ज्ञानाच्या शिदोरीवर मी शिक्षक झालो. उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात पदार्पण केले आणि माझ्या प्रामाणिकपणाच्या सामर्थ्यावर खूप काही मिळाले. ज्या संस्थेने मला जे काही दिले त्या संस्थेसाठी सढळ हाताने देण्यात आणि दुसर्‍याच्या चेहर्‍यावरचा आनंद शोधण्यात मला आनंद प्राप्त होतो. हेच माझ्या जगण्याचे गमक आहे. म्हणून मला मिळणार्‍या पैशांपैकी जेवढे म्हणून देता येतील तेवढे देण्यात मला आनंद वाटतो.फ

खरंतर मी अत्यंत सामान्य कुटुंबातील विद्यार्थी, रयत शिक्षण संस्थेतील कमवा व शिका योजनेमुळे शिकू शकलो. याच संस्थेने मला प्राध्यापक म्हणून सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली. एवढेच नव्हे तर संस्थेचे लाईफ वर्कर, लाईफ मेंबर, प्राचार्य, मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, संस्थेचे ऑडिटर अशा विविध पदांवर काम करण्याची संधी दिली. ज्या सभागृहामध्ये खूप कर्तृत्वसंपन्न माणसांनी संस्थेला एक वैचारिक दिशा दिली त्यामध्ये लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेब यांनी मांडलेले विचार ऐकण्याची आणि त्याप्रमाणे कृती करण्याची संधी मला मिळाली. यासारखे दुसरे कोणतेही चांगले भाग्य असू शकत नाही.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे व्यक्तिमत्व आणि वैचारिक बैठक प्रा. डॉ. एन. डी. पाटील, माजी खा. दि. बा. पाटील अशा पुरोगामी विचारवंतांच्या वैचारिकतेवर निर्माण झाली आहे. संपूर्ण जीवनभर विचारांशी एकनिष्ठ राहून साहेबांनी शैक्षणिक, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा एक वेगळा ठसा निर्माण केला. त्यांच्या वैचारिक परंपरेला साजेल असेच कर्तृत्व त्यांनी आयुष्यभर केले. त्यामुळे या मान्यवर व्यक्तिंच्याबद्दल जेव्हा जेव्हा कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रसंग त्यांच्या जीवनात आला तेव्हा तेव्हा त्यांनी ही संधी कधीच सोडली नाही. एक दिवस रामशेठ ठाकूरसाहेब यांचा मला फोन आला. त्या वेळी मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध पुणे याठिकाणी प्राचार्य म्हणून काम करत होतो. आमच्यामध्ये असणारे ऋणानुबंध मध्यंतरीच्या काळात अधिक परिपक्व झाले होते. साहेब मला फोनवर म्हणाले, मेनकुदळे सर, मला तुम्हाला भेटायचे आहे. माझे एक काम आहे. ठाकूरसाहेबांना म्हणालो, साहेब, तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा मला सांगा. मी वाशीला येऊन आपली भेट घेतो. दोन दिवसांनंतर मी नवी मुंबई याठिकाणी त्यांची भेट घेतली. त्यांनी मला येण्यापूर्वी माझे आवडते काम सांगितले होते. ते म्हणाले, डॉ. एन. डी. पाटील साहेब यांना जीवनगौरव पुरस्कार द्यायचा आहे. त्यासाठी मानपत्र तयार करा. मी मानपत्र तयार केले आणि सी. के. टी. कॉलेजवर गेल्यावर ते मानपत्र साहेबांना वाचून दाखविले. ते साहेबांना खूप आवडले. या मानपत्राबरोबरच एन.  डी. सरांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारा अत्यंत विस्तृत असा लेख मी तयार केला आणि तो साहेबांकडे सुपूर्द केला.

सर्वसामान्य माणसाचे हित पाहणे, त्याच्या आड कोणी येत असेल तर संघर्षासाठी उभे राहणे हा ठाकूरसाहेबांचा स्थायीभाव. व्हीव्हीएफ आंदोलन असो अथवा एसईझेड आंदोलन, ठाकूरसाहेब कधी मागे हटले नाहीत. न्याय्य भूमिका घेणारा त्यांच्यातला शिक्षक बहुदा त्यांना अशावेळी नैतिक बळ देत असावा असे वाटते.

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ ही संस्था, ङ्गरामप्रहरफ वृत्तपत्र, मल्हार टीव्ही चॅनेल, मल्हार महोत्सव, राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा, मॅरेथॉन, महाआरोग्य शिबिर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मंडळे, गुणवत्ता सुधार उपक्रम ही समाजहितैषि उपक्रमांची जंत्री पाहिली की ठाकूरसाहेबांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. या सर्व उपक्रमांमधील सातत्य वाखाणण्याजोगे आहे. एकाच वेळी प्रचंड मोठे उद्योग सांभाळणे, विविध सामाजिक उपक्रम राबवणे, शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणे, राजकारणात सक्रिय असणे आणि हे सर्व कमालीच्या निष्ठेने करणे ही सोपी गोष्ट नव्हे. कधी कधी तर प्रश्न पडतो रामशेठ ठाकूर एक व्यक्ती आहेत की अनेक? 

रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हा प्रकल्पठाकूरसाहेबांच्या जीवनातील सर्वांत मोठा व महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. तशी विद्यार्थीदशेपासून क्रीडा क्षेत्राची आवड, पण आर्थिक अडचणींमुळे त्यांना या क्षेत्रात पुढे जाता आले नाही. आपल्या भागातील खेळाडूंना संधी उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांच्यातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरचे दर्जेदार खेळाडू घडविण्यासाठी भव्य क्रीडा संकुल उभारण्याचे स्वप्न होते. 2006मध्ये हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला. पनवेल आणि उरण तालुक्यांना मध्यवर्ती ठरेल अशा ठिकाणी क्रीडा संकुल उभे करण्याचे ठरले. त्यासाठी जागा शोधण्याचे काम सुरू असताना सिडको महामंडळ हे उलवा नोडमध्ये अशाच प्रकारचे खेळासाठी संकुल विकसित करू इच्छित असल्याचे समजले. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने या कार्यासाठी अर्ज केला. मंडळाचे कार्य, मंडळाचे आधारस्तंभ या सर्व बाबींचा विचार करून सिडकोने ही जमीन व नियोजित वास्तूचा सांभाळ करण्याची जबाबदारी मंडळास दिली, परंतु दिलेली जागा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा संकुलासाठी कमी पडत होती. दर्जाच्या बाबतीत

ठाकूरसाहेबांना कसलीच तडजोड मान्य नव्हती. शेवटी वाढीव जागेची मागणी ठाकूरसाहेबांनी केली. याबाबत स्पोर्ट्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाकडे (एसएआय) दाद मागण्याचे ठाकूरसाहेबांनी ठरवले. ठाकूरसाहेबांच्या कार्याची तळमळ बघून एसएआयने ही मागणी उचलून धरली आणि क्रीडा संकुलासाठीच्या वाढीव जागेचा प्रश्न निकाली निघाला, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा संकुल बांधायचे म्हणजे पैसाही प्रचंड लागणार होता. बांधकामापूर्वी मेंबरशिप खुली करण्याची पारंपरिक पद्धत अवलंबली तर अनेक बंधने येणार, शिवाय प्रकल्प लांबण्याची शक्यता जास्त. त्यातून कामाचा दर्जा ढासळणार. या सर्वच गोष्टी टाळण्यासाठी ठाकूरसाहेबांनी एक धाडसी निर्णय घेतला. स्वत:च्या व्यवसायवृद्धीसाठी कुंडेवहाळ परिसरात पूर्वी घेऊन ठेवलेली पन्नास एकर जमीन विकून पैसे उभे करण्याचे त्यांनी ठरविले. एका सामाजिक प्रकल्पासाठी स्वत:च्या मालकीची अत्यंत मोलाची जमीन विकून पैसे उभे करण्याची ही घटना आजच्या काळातली एक दुर्मीळ घटना म्हणावी लागेल. अखेर सर्व अडचणींवर मात करून सिडकोने दिलेल्या मुदतीपेक्षा सहा महिने अगोदरच ठाकूरसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य असे रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभे राहिले.

इनडोअर आणि आऊटडोअर अशा दोन्ही प्रकारच्या खेळांचा समावेश असलेल्या या क्रीडा संकुलात बॅडमिंटन, टेनिस, जलतरण, स्नुकर बिलियर्ड्स अशा विविध खेळांबरोबर महाराष्ट्रात क्वचितच आढळणार्‍या वॉलक्लायम्बिंगचा थरारही आज अनुभवायला मिळत आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्राला हे क्रीडा संकुल वरदान  आहे. या क्रीडा संकुलाच्या उद्घाटनासाठी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांना बोलावण्यात आले होते. ही भव्य वास्तू बघून गोपीचंददेखील प्रेमात पडले. त्यांनी रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे मानद सदस्यत्व मोठ्या आनंदाने स्वीकारले. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी बॅडमिंटन खेळण्याचा आनंदही लुटला.

ज्या जागेवर खाचखळगे, वेड्यावाकड्या टेकड्या आणि उजाड माळरान होते त्या जागेचे रूपडे ठाकूरसाहेबांच्या दूरदृष्टीने आज पूर्ण पालटले आहे. स्वप्न सत्यात उतरले आहे. ग्रामीण भागातील गुणवत्तेला यानिमित्ताने वाव मिळत आहे.

सन्मान आणि पुरस्कारासाठी आजवर ठाकूरसाहेबांनी कधीच काम केले नाही. सर्वार्थाने मोठ्या असलेल्या या माणसाच्या कर्तृत्वाच्या सन्मानासाठी पुरस्कारच त्यांच्याकडे चालत आले. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकदा त्यांचा गौरव झाला. आर. के. एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड, भारत ज्योती अ‍ॅवॉर्ड, समाज भूषण पुरस्कार, रयत शिक्षण संस्थेचा इस्माईलसाहेब मुल्ला जीवनगौरव पुरस्कार असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले. मानसन्मान आणि सभा सोहळ्यांमध्ये न रमणारा हा माणूस खर्‍या अर्थाने रमला तो लोकांच्यात. लोकांसाठी उभ्या करीत असलेल्या कामात. आजही ठाकूरसाहेबांच्या घरात एकही दिवस असा उजाडत नाही की सकाळी सात वाजता पन्नासपेक्षा कमी लोक ठाकूरसाहेबांना भेटायला आले आहेत. हे घर लोकांना आपले वाटते. हक्काचे वाटते. येथे भेदभाव नाही. अगदी घराच्या सुरक्षारक्षकापासून ते गाडीच्या चालकांपर्यंत आणि एखाद्या कामासाठी आलेल्या अनोळखी सामान्य माणसापासून एखाद्या मंत्री-आमदारापर्यंत सर्वांना एकाच पंगतीला सोबत घेतल्याशिवाय जेवण केले जात नाही. रयतेच्या कमवा, शिका योजनेतील खानावळीतला हा कर्मवीरांचा संस्कार ठाकूरसाहेबांच्या घरात जिवंत आहे. पुढच्या

पिढीकडेदेखील तो हस्तांतरित झाला आहे.

रयतच्याच कार्यक्रमात एकदा ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव म्हणाले होते, ङ्गतुम्ही गरीब, दरिद्री म्हणून जन्माला आला तर तो दोष तुमचा नाही, पण तुम्ही गरीब आणि दरिद्री म्हणून मेलात तर मात्र तो दोष तुमचा आहे.फ नियतीने असा दोष आपल्याला द्यावा अशी परिस्थितीच ठाकूरसाहेबांनी ठेवली नाही. कर्तृत्वाने संपत्ती आणि सुबत्ता त्यांनी मिळवली, पण त्याच वेळी आपला विवेक यत्किंचितही ढळू दिला नाही. दारिद्य्राचे अवडंबर केले नाही की श्रीमंतीचे प्रदर्शन केले नाही. दोन्ही स्थितीत रामशेठ ठाकूर स्थितप्रज्ञ राहिले आहेत. अविचल राहिले आहेत.

त्यांचा सहवास, त्यांची कार्यपद्धती, जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन या सर्वांचा अनुभव घेताना माणूस म्हणून आपण समृद्ध होत आहोत, वाढत आहोत अशीच आमची भावना आहे. कर्मवीर  अण्णांना आम्ही प्रत्यक्ष पाहिले नाही, परंतु अण्णांचे हे खरे वारसदार आपल्या अस्तित्वाने आमचे जीवन समृद्ध करीत आहेत. आम्ही कृतार्थ आहोत, आम्ही कृतज्ञ आहोत.

-प्रिं. डॉ. शिवलिंग मेनकुदळे

ऑडीटर, रयत शिक्षण संस्था, सातारा

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply