अकोला ः प्रतिनिधी
कोरोनामुळे यंदाही पंढरपूरची पायी वारी होणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्याऐवजी मानाच्या पालख्यांना बसने वाखरीपर्यंत पादुका नेण्याचे नियोजन सरकारने केले आहे. वाखरीवरून प्रतीकात्मक स्वरूपात पालख्या पायी पंढरपूरला जाणार आहेत, मात्र सरकारच्या या निर्णयाला राज्यातील वारकर्यांच्या नऊ संघटनांनी विरोध केला आहे. या संघटनांनी सरकारला या निर्णयावर पुनर्विचार करायला 24 जूनपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने ज्ञानोबा-तुकाराम महाराजांच्या पालख्यांना 50 लोकांसह पायी दिंडीची परवानगी दिल्यास आंदोलनावर फेरविचार करणार असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे. सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 3 जुलैला आळंदी ते पंढरपूर अशी पायी वारी काढू. संघटनांचे प्रत्येकी 10 जण जत्थ्याने सहभागी होणार असून वारीत वारकरी स्वत:हून कोरोना नियमांचे पालन करणार असल्याचेही या संघटनांनी स्पष्ट केले आहे.