Breaking News

कोर्लईनजीक समुद्रात बार्ज कलंडले; सर्व 16 जणांना वाचविण्यात यश

रेवदंडा ः प्रतिनिधी

मुंबईहून साळाव जेएसडब्ल्यू कंपनीकडे येणारे एम. व्ही. मंगलम नावाचे बार्ज गुरुवारी (दि. 17) सकाळी 7.30च्या सुमारास कोर्लईनजीक समुद्रात कलंडले. सुदैवाने या बार्जमध्ये असलेल्या सर्व 16 कामगारांना वाचविण्यात तटरक्षक दलाला यश आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन साळाव जेएसडब्लू कंपनीच्या अधिकारीवर्गाने बंदर प्रादेशिक विभाग, रेवदंडा पोलीस ठाणे यांना संपर्क केला. या वेळी बार्जमध्ये पाणी शिरू लागल्याने ते केव्हाही पाण्यात बुडण्याची शक्यता होती. त्यामुळे तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला पाचारण करण्यात आले. या हेलिकॉप्टरच्या साह्याने बार्जमधील 16 कामगारांना सुखरूपपणे रेवदंडा समुद्रकिनारी आणण्यात आले. यासाठी मेरीटाइम बोर्ड, पोलीस विभाग आणि विशेषतः तटरक्षक दलाने परिश्रम घेतले. पाऊस आणि वार्‍याचा जोर असल्याने समुद्र खवळलेला होता. त्यामुळे मदत व बचावकार्य करणे आव्हानात्मक होते. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास तटरक्षक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले व हेलिकॉप्टरच्या मदतीने त्यांनी तराफ्यावर अडकून पडलेल्या सर्व 16 खलाशांची सुखरूप सुटका केली. 

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply