निवृत्तीच्या काळात आपल्या आर्थिक गरजा आपल्याच उत्पन्नातून भागल्या पाहिजेत, असे प्रत्येकाला वाटते. पण असे होण्यासाठी निवृत्त होईपर्यंत तयारी करणे आवश्यक असते. त्या तयारीचा भाग असलेले हे काही महत्त्वाचे मुद्दे
भविष्याची फार चिंता करू नये, असे म्हणतात. पण ती चिंता करत नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. विशेषतः वाढत्या आर्थिक गरजांमुळे, आर्थिकदृष्ट्या आपण स्वावलंबी कसे होऊ, असा प्रत्येक व्यक्ती नेहमीच विचार करत असते. असा विचार करताना नेमके काय करावे, हे सुचत नाही. अशा सर्वांना हे नियोजन करणे कसे सोपे जाईल, हे आपण पाहूयात. विशेषतः आपल्या निवृत्तीनंतर नेमके किती पैसे साठवले पाहिजेत. याबाबत काही सोप्या पायर्यांची निवड करून आपण नेमके किती पैसे प्रतिमाह वाचवले व गुंतवले म्हणजे आपली निवृत्ती उत्तमरीत्या पार पडेल, हे पाहूयात. बर्याचवेळा असा ग्रह होतो की, निवृत्ती योजना (रिटायरमेंट प्लॅनिंग) म्हणजे क्लिष्ट प्रक्रिया आहे. त्यामुळे याबाबत सर्वसामान्य माणूस गोंधळात पडतो व या नियोजनाची नेमकी कशी सुरुवात करावी हे समजत नाही. प्रत्यक्षात निवृत्तीचे आर्थिक नियोजन अतिशय सोपी प्रक्रिया आहे. फक्त त्यासाठी संयम आणि शिस्त महत्त्वाची आहे. शक्य तितक्या तरुण वयात आपल्या निवृत्तीसाठी पैसे गुंतवण्यास सुरुवात करणे हे अत्यंत फायदेशीर ठरते.
निवृत्तीसाठी नियोजन करत असताना योग्य गुंतवणूक पर्यायामध्ये गुंतवणे अत्यंत आवश्यक आहे. जेणेकरून रकमेची वाढ वेगाने होईल व निवृत्तीसाठी मोठी रक्कम तयार व्हावी.
निवृत्ती नियोजनातील काही गोष्टी : (1) मासिक खर्चाची विभागणी दोन भागात करा – सर्वांत प्रथम आपल्या निवृत्तीनंतर प्रतिमाह किती रक्कम खर्चासाठी लागणार आहे याची आकडेवारी तयार करा. आपली सर्व अपेक्षित खर्चांची यादी तयार करा. उदा. किरकोळ खर्च तसेच अत्यावश्यक सेवांचे खर्च, कपड्यांवरील खर्च, घरखर्च, भेटवस्तूंवरील खर्च या सर्वांचा निवृत्तीकाळात नेमका किती खर्च होणार आहे याचा अंदाज घ्यायला हवा. निवृत्तीनंतर वैद्यकीय खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. याचप्रमाणे निवृत्तीनंतर धार्मिक स्थळांना भेटी घडल्याने प्रवासखर्च वाढतात. तसेच नातेवाईक व मित्रपरिवाराकडे भेटीगाठी वाढतात.
निवृत्तीनंतरही पुढील खर्च सुरूच राहतात – 1) अन्नधान्य व घरखर्च 2) टेलिफोन व इलेक्ट्रिसिटी बिल 3) वैद्यकीय खर्च 4) भाडे/ मेन्टेनन्स 5) नेहमीच्या कपड्यांवर होणारा खर्च 6) वार्षिक सहली 7) पेट्रोल व गाडीचा मेन्टेनन्स 8) भेटवस्तू व लग्नसमारंभ तसेच विविध कार्यक्रमांवरील खर्च
निवृत्तीनंतर पुढील खर्च बंद होतात – 1) मुलांच्या शिक्षणावरील खर्च 2) व्यावसायिक कपड्यांवरील खर्च 3) घरावरील कर्जाचे हप्ते 4) नोकरी-व्यवसायानिमित्त होणारा प्रवासखर्च
(2) निवृत्तीनंतरच्या उत्पन्नाची चाचपणी करा – पुढची पायरी म्हणजे सर्व माध्यमातून मिळणारे एकूण उत्पन्न निवृत्तीनंतर किती होणार आहे याचा नेमका अंदाज घ्या. मिळणारे निवृत्तीवेतन, काही विम्याच्या पॉलिसीतून मिळणारी पेन्शन यासारख्या उत्पन्नांची नोंद एकूण उत्पन्नांची गोळाबेरीज करताना घ्या. घरभाडे मिळत असेल तर ते उत्पन्नही लक्षात घेतले पाहिजे. सध्या मिळणारा पगार व निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन यातील फरक याचा नेमका अंदाज घ्या.
(3) निवृत्तीनंतर नेमके किती उत्पन्न असणार आहे याचा आढावा घ्या- वर उल्लेख केल्याप्रमाणे एकूण उत्पन्नातून सर्व खर्च वजा जाता किती रक्कम शिल्लक राहणार आहे याचा विचार करा. उदाहरणार्थ जर निवृत्तीनंतर मासिक खर्च 40 हजार रुपये आहे व उत्पन्न 20 हजार रुपये आहे याचाच अर्थ 20,000 रुपयांची आणखी गरज आहे. या वाढीव उत्पन्नाची आपल्याला आजच सोय करायला हवी.
(4) निवृत्तीनंतर दरमहा लागणारी जादाच्या रकमेची तरतूद- ही तरतूद करताना भविष्यातील मूल्य लक्षात घेऊन तयारी करा. दरमहा खर्चासाठी लागणारी वाढीव रक्कम (जादाची) जरी छोटी असली तरी काळानुसार ती वाढतच जाते याचे कारण म्हणजे वाढणारी महागाई. जसे सध्याची चलनवाढ तीन टक्के आहे तरी एकूण वार्षिक सरासरी लक्षात घेतली तर चलनवाढ किमान सहा टक्के धरावी. भविष्यातील उत्पन्नांची मोजणी करताना आजपर्यंतच्या चलनवाढीची सरासरी लक्षात घेऊन निवृत्तीनंतरच्या उत्पन्नाची रक्कम काढावी. उदाहरणार्थ – जर आपला मासिक खर्च आजच्या घडीला 1,00,000 रुपये असेल तर पुढील काळात आपल्याला किती पैसे लागतील याचा तक्ता पुढीलप्रमाणे – निवृत्तीनंतर लागणार्या निवृत्तीनिधीची वय वर्षे 60पर्यंत किती आवश्यकता आहे याचा नेमका अंदाज घ्या. वयाच्या 60व्या वर्षी नेमका किती निवृत्ती निधी असायला हवा याची आकडेवारी काढताना अनेक महत्त्वाच्या बाबींचा आढावा घ्यावयास हवा. उदाहरणार्थ – जगण्याचे अपेक्षित वय, संपत्तीची नेमकी विभागणी, त्या संपत्ती व गुंतवणुकीतून निर्माण होणारे उत्पन्न व त्याचे मूल्य यांचा अपेक्षित दराने मिळणारा परतावा किती याचा नेमका विचार करणे आवश्यक आहे. सध्या वैद्यकीय शास्त्रातील प्रगतीमुळे माणसाचे जगण्याचे वय वाढत आहे याचा निवृत्ती निधी ठरवताना विचार केला पाहिजे. त्यामुळे 60 वर्षांनी निवृत्त झाल्यावरही जगणे 80 ते 90 वर्षांपर्यंत जात आहे. यामुळेच 60व्या वर्षी निवृत्ती घेतल्यानंतर पुढील 30 वर्षांतील खर्चांची व उत्पन्नाची सोय करणे आवश्यक आहे. हे करत असताना आपल्या कमावत्या वयात निर्माण केलेली संपत्ती नेमकी कशी व कुठे गुंतवायची याचा आढावा अत्यंत आवश्यक आहे. साठवलेले पैसे कोणत्या गुंतवणूक साधनात ठेवल्याने त्याची भविष्यात मोठ्या संपत्तीमध्ये रुपांतर होऊ शकेल याचा विचार करा, कारण त्याचा निश्चितपणे निवृत्ती निधीवर परिणाम होत असतो.
(5) निवृत्तीसाठी गुंतवणूक पर्यायाची योग्य निवड करा – निवृत्तीसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. ईपीएफ (एम्प्लॉयी प्रॉव्हिडन्ट फंड), पीपीएफ (पब्लिक प्रॉव्हिडन्ट फंड), एनपीएस (नॅशनल पेन्शन स्कीम), बॉन्डस् (रोखे), पेन्शन योजना, इक्विटी म्युच्युअल फंड, डेट म्युच्युअल फंड, बँक डिपॉझिट, विमा पॉलिसी इत्यादी. वयाच्या 60व्या वर्षी एक कोटी रुपयांचा निवृत्ती फंड तयार करण्यासाठी प्रतिमाह इक्विटी म्युच्युअल फंडात नेमकी किती गुंतवणूक करावी हे वयानुसार पुढील तक्त्यात सुचवले आहे. तरुणांना त्याचा उपयोग होईल.
वय प्रतिमाह गुंतवणूक 60व्या वर्षी मिळणारी रक्कम
30 4,085 1 कोटी रुपये
35 7,166 1 कोटी रुपये
40 12,771 1 कोटी रुपये
45 23,065 1 कोटी रुपये
50 45,210 1 कोटी रुपये
55 1,08,685 1 कोटी रुपये
(नोट – इक्विटी म्युच्युअल फंडाचा परतावा 12 टक्के प्रतिवर्ष गृहित धरला आहे.)
-संदीप भूशेट्टी