पेण : प्रतिनिधी – पेण विधानसभा क्षेत्राचा लोकप्रतिनिधी म्हणून मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या इतर सर्व मागण्यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे आमदार रविशेठ पाटील यांनी म्हटले आहे. तसे पत्र त्यांनी मराठा समाजाच्या पदाधिकार्यांना दिले.
मराठा समाजास महाराष्ट्र विधान मंडळात एसईबीसी अंतर्गत कायदा करीत आरक्षण देण्यात आले, परंतु त्यास सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्याने मराठा विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवेश व सवलतीचा प्रश्न तसेच मराठा युवकांना विविध स्पर्धा परीक्षा व नोकर भरतीच्या प्रक्रिया चालू असल्याने निर्माण झालेल्या समस्या सोडविण्याबाबत आमदार म्हणून त्याचा विधिमंडळ व आवश्यक त्या स्तरावर पाठपुरावा करेन आणि एकूणच मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देत आहे, असे आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन पुकारण्यात आले आहे. मराठा आरक्षणाला घटनात्मक संरक्षण मिळाले पाहीजे. याकरिता राज्य सरकारने प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजे, असेही आमदार पाटील यांनी म्हटले आहे. या वेळी पेण तालुका सकल मराठा संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.