खोपोली ः प्रतिनिधी
काळ्या बाजारात विक्रीकरिता नेण्यात येत असलेला सुमारे साडेचौदा लाखांचा गहू स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अलिबाग-रायगड यांनी खालापूर टोलनाक्यावर पकडला असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. साकीनाका मुंबई येथील गोडाऊनमधील रेशनवर वितरित करण्यासाठी आणलेला गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी पहाटे खालापूर टोल नाका येथे पोलिसांनी सापळा रचला. पहाटे तीनच्या सुमारास संशयित ट्रक (क्र. एमएच-43-बीपी-4290) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून जाताना खालापूर टोल नाक्यावर पोलिसांनी अडवला. ट्रकची तपासणी केली असता त्यात सदरचा गहू आढळला. या वेळी सुमारे 14 लाख 48 हजार 740 रुपयांचा गहू जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी प्रवीण गेला गामी (रा. साकीनाका, मुबंई) आणि मोहम्मद आयुब मोहम्मद जलील शेख (रा. कुरेशीनगर, कुर्ला, मुंबई) यांना अटक केली आहे. याबाबत खालापूर पोलीस ठाणे येथे भारतीय दंड विधान (आयपीसी) प्रमाणे (भाग 6) दाखल गुन्हे, जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955चे कलम 3, 7, 8, 9प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अलिबाग पोलीस निरीक्षक दयानंद गावडे करीत आहेत.