Breaking News

ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजपचे उद्या चक्का जाम आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळे सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले, याचा निषेध करण्यासाठी आणि हे आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शनिवारी (दि. 26) राज्यातील किमान एक हजार ठिकाणी चक्का जाम आंदोलन करणार असून पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह एक लाख कार्यकर्ते अटक करून घेणार आहेत, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मुंबईत केली. भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठक गुरुवारी मुंबई व राज्यात ठिकठिकाणी ऑनलाइन पद्धतीने झाली. त्यानंतर बैठकीतील निर्णयांची माहिती देताना पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यामध्ये 26 जून रोजी किमान एक हजार ठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते चक्काजाम आंदोलन करतील. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नागपूर येथे तर मी स्वतः कोल्हापूर येथे आंदोलनात सहभागी होणार आहे. तर भाजप केंद्रीय सचिव पंकजा मुंडे पुणे येथील आंदोलनात सहभागी होतील. राज्यभरात एक लाख कार्यकर्ते अटक करून घेतील. ते म्हणाले की, ओबीसींचे आरक्षण रद्द झाले असताना पाच जिल्हा परिषदा व त्यांच्या अंतर्गत पंचायत समित्यांच्या जागांची पोटनिवडणूक जाहीर करून जखमेवर मीठ चोळले आहे.

‘अजित पवार, अनिल परब यांची चौकशी व्हावी’

चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, परमबीर सिंग यांच्या पत्राच्या आधारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने सचिन वाझे याच्या पत्रातील वसुलीच्या आरोपाविषयी अजित पवार आणि अनिल परब यांचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply