Breaking News

अंबोली धरण भरल्याने मुरूडकर सुखावले

मुरुड तालुक्यात आतापर्यंत 883 मिलीमीटर पाऊस पडला असून फार कमी वेळेतच आंबोली धरण तुडुंब भरल्याने समाधान व्यक्त केले आहे. अधिकाधिक जमीन ओलिताखाली आणून बळीराजाचे मनोधैर्य वाढविण्याचे  प्रयत्न सुरु आहेत. तथापि मुरुड तालुक्यांतील आंबोली धरणावर अबलंबून असलेल्या उजव्या व डाव्या तीर कालव्याचे काम तब्बल चार वर्षांपासून बंद असल्याने  हजारो शेतकर्‍यांना कालव्याचे पाणी मिळत नाही.
लघुपाट बंधारे प्रकल्पांतर्गत उभारलेल्या अंबोली धरणाची पाणी साठवण क्षमता प्रंचड आहे. मात्र  धरणाच्या उजव्या आणि डाव्या तीर कालव्याचे काम जून 2015 पासून बंद असल्याने शेतकर्‍यांना शेतीसाठी धरणाचे पाणी मिळत नाही. 7.10 किमी. लांबीच्या उजव्या तीर कालव्याचे  6.10 किमी काम अपूर्ण आहे. तर डावा तीर कालवा  2.64 किमी लांबीचा असून त्यापैकी 1.64 किमी काम अपुर्ण आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात काही मोजक्याच गावांना धरणातील पाणी मिळत आहे. कालव्याचे काम पूर्ण झाल्यास सुमारे 600 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून शेतकर्‍यांना पुरक व्यवसायाची संधी मिळणार आहे. त्यातून रोजगार प्राप्त होऊन स्थानीक शेतकरी स्वयंनिर्भर बनण्यास मदत होणार आहे.
हे धरण मुरुडसह लगतच्या 12 गावांची जीवनवाहिनी ठरले आहे. आंबोली धरणातून मुरुड शहराला पाणीपुरवठा होतो. धरणातील 10 टक्के पाण्यामुळे संपूर्ण शहराला मुबलक पाणीपुरवठा होत असतो.  
आंबोली धरण मुरुडपासून सहा किमी अंतरावर असून या मातीच्या धरणाची लांबी 518 मीटर, उंची 32.09 मीटर, एकूण पाणीसाठा क्षमता 9.96 दशलक्ष घनमीटर आहे. मुरूड शहरासाठी 0.849 दशलक्ष घनमीटर तर लगतच्या गावांना सिंचनाकरीता 9.11  दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होऊ शकेल, अशी माहिती आहे.
पावसाळ्यात आंबोली धरण परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. धरणाचे विसर्ग झालेले पाणी अंगावर घेण्यास पर्यटकांना खूप मज्जा येते. येथील चौकोनी हौदात मनसोक्त पोहता येत असल्याने विविध ठिकाणचे पर्यटक या ठिकाणी येत असतात.
पेण येथील हेटवणे मध्यम प्रकल्प उपविभागाच्या अखत्यारीत अंबोली लघु पाटबंधारे योजना प्रकल्प येत असून हे धरण 23 जून 2021 रोजी सकाळी पुर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून विसर्ग सुरु झाला आहे. या धरणातील पाण्याची पातळी 42.80 मी. असून सांडव्यावरून वाहणारा विसर्ग 1.63  घ.मी. प्रती सेंकद इतका आहे.
त्यामुळे या धरण क्षेत्रातील गोयगान, उंडरगाव, बौद्धवाडी, जोसरांजण, वाणदे, शिघ्रे, छोटी अंबोली, खार आंबोली, तेलवडे, माझेरी, गोलघुमट परिसर व नदीकाठच्या ग्रामपंचायत हद्दीमधील लोकांना सर्तकतेचा इशारा हेटवणे मध्यम प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता अ. द. रोकडे यांनी दिला आहे.  
धरण तुडुंब भरले तरी पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे ग्रामस्थांना कोणताही धोका पोहचत नाही. धरण फुटले तरच आजूबाजूच्या गावांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे खार आंबोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व स्थानिक शेतकरी मनोज कमाने यांनी सांगितले.
शासनांनी कालव्याची कामे पूर्ण करण्याकरिता निधी उपलब्ध करून दिल्यास येथील शेतकर्‍यांना दुबार शेती करता येईल व धरणातील पाणीसुद्धा योग्य कारणासाठी खर्च होईल.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply