Breaking News

कोरोना निर्बंध आणखी वाढणार!

राज्य सरकारचे नवे आदेश; आता सर्व जिल्हे तिसर्‍या स्तरात

मुंबई ः प्रतिनिधी
डेल्टा, डेल्टा प्लस या नव्या व्हेरिएंटमुळे कोरोनाचा धोका आणखी वाढला असून तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने काही कठोर निर्णय घेतले आहेत. राज्यात टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यासाठी यापूर्वी निश्चित करण्यात आलेल्या निकषांमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे राज्यातील निर्बंध आणखी कडक होणार आहेत.
राज्यातील रत्नागिरी, जळगावसह काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत. हा व्हेरिएंट अत्यंत घातक आहे. त्याचा प्रसार वेगाने होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून राज्याच्या मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने नवे आदेश काढले आहेत. त्यानुसार कोरोना संसर्गाचा दर व ऑक्सिजन बेडची संख्या काहीही असली तरी यापुढे राज्यातील सर्व जिल्हे तिसर्‍या स्तरावरच असल्याचे ग्राह्य धरले जाणार आहे. त्यानुसार स्थानिक प्रशासनाला आपापल्या जिल्ह्यात कठोर निर्बंध लादण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला राज्याची परवानगी घेण्याची गरज नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
‘ब्रेक द चेन’च्या अंतर्गत लागू करण्यात आलेले निर्बंध शिथिल करताना राज्य सरकारने यापूर्वी पाच स्तर ठरविले होते. त्यासाठी 4 जून रोजी आदेश काढण्यात आले होते, मात्र कोरोनाचा विषाणू सतत रूप बदलत असल्याने व वेगवेगळ्या स्वरूपात हल्ले करीत असल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे आदेशात महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
निर्बंधांचे स्तर ठरविताना यापूर्वी कोरोना संसर्गाचा दर गृहित धरला जात होता, मात्र त्यात अँटीजेन आणि आरटी-पीसीआर या दोन्ही प्रकारच्या टेस्ट ग्राह्य धरल्या जात होत्या. आता यात बदल करण्यात आला आहे. यापुढे कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर निश्चित करताना केवळ आरटी-पीसीआर चाचण्या ग्राह्य धरल्या जाणार आहेत. रॅपिड अँटीजेन टेस्ट किंवा अन्य चाचण्यांचा आधार त्यासाठी घेता येणार नाही.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply