Monday , February 6 2023

पोर्तुगालने फ्रान्सला बरोबरीत रोखले

रोनाल्डोची चमक

बुडापेस्ट ः वृत्तसंस्था
युरो चषक फुटबॉल स्पर्धेत साखळी टप्प्यातील शेवटच्या सामन्यात थरारक खेळाची अनुभूती चाहत्यांना घेता आली. ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलमुळे पोर्तुगालने जगज्जेत्या फ्रान्सला 2-2 असे बरोबरीत रोखले. जर्मनीला हंगेरीविरुद्ध बरोबरी पत्करावी लागली तरी फ गटातून फ्रान्स, जर्मनी आणि पोर्तुगालने बाद फेरीत प्रवेश केला.
रोनाल्डोने 109वा गोल करीत सर्वाधिक गोल करणार्‍या इराणच्या अली डेई यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली. युरो चषकाच्या पाच पर्वांमध्ये खेळताना रोनाल्डोने 14 गोल साकारले आहेत. फ्रान्सच्या मायकेल प्लॅटिनी (नऊ गोल) यांच्यापेक्षा त्याने पाच अधिक गोल केले आहेत. रोनाल्डोने यंदाच्या साखळी फेरीत तब्बल पाच गोल लगावले आहेत.
रोनाल्डोच्या दोन गोलमुळे पोर्तुगालने फ गटातील फ्रान्सविरुद्धचा अखेरचा सामना 2-2 असा बरोबरीत सोडवला. रोनाल्डोने 30व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल केल्यानंतर करीम बेंझेमाने 45व्या आणि 47व्या मिनिटाला गोल करीत फ्रान्सला 2-1 असे आघाडीवर आणले होते, पण रोनाल्डोने 60व्या मिनिटाला पेनल्टीवर दुसरा गोल करत पोर्तुगालला बरोबरी साधून दिली.
फ गटातील दुसर्‍या सामन्यात बलाढ्य जर्मनीला हंगेरीविरुद्ध 2-2 अशी बरोबरी पत्करावी लागली. अ‍ॅडम झालायच्या गोलमुळे हंगेरीने 11व्या मिनिटालाच आघाडी घेतल्यानंतर जर्मनी संघ दबावाखाली होता. अखेर काय हॅवर्ट्झने 66व्या मिनिटाला जर्मनीला बरोबरी साधून दिली. पण त्यांना हा आनंद फार काळ टिकवता आला नाही. दोन मिनिटांनी आंद्रास शाफेर याने हंगेरीला पुन्हा एकदा आघाडीवर आणले. लेऑन गोरेत्झ्का जर्मनीच्या मदतीला धावून आला. त्याने 84व्या मिनिटाला केलेला गोल सामन्यात बरोबरी साधणारा ठरला.
फ गटातील दोन्ही सामने बरोबरीत सुटले असले तरी फ्रान्सने पाच गुणांसह पहिले स्थान पटकावले. जर्मनीने गोलफरकाच्या आधारावर चार गुणांसह दुसरे स्थान प्राप्त केले. पोर्तुगालला चार गुणांनिशी तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानावे लागले. या तिन्ही संघांनी बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. 

Check Also

कर्जतमधील रायगड जिल्हा बँकेची शाखा जळून खाक

कर्जत : प्रतिनिधी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेला रविवारी (दि. 5) पहाटेच्या सुमारास आग …

Leave a Reply