महाड : प्रतिनिधी
विधानसभेच्या महाड मतदारसंघामध्ये सोमवारी दिवसभरात उत्साहपूर्ण वातावरणात मतदान झाले. सकाळी मतदानाचे प्रमाण कमी राहिले मात्र 10 वाजल्यापासून हे प्रमाण वाढले. 65 टक्के मतदान झाले. काही ठिकाणी ईव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याच्या घटना घडल्या, मात्र तत्काळ त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली आहे. महाड मतदारसंघात सोमवारी सकाळपासून मतदानास शांततेत सुरुवात झाली. मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सुविधा, वीज व्यवस्था, दिव्यांग व्यक्तींसाठी व्हीलचेअर आणि मदतनीस पुरवण्यात आले होते. यामुळे दिव्यांग मतदारदेखील मतदानाकरिता मोठ्या प्रमाणावर बाहेर पडले होते. महाड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांनी आपल्या कुटुंबासह प्राथमिक शाळा खरवली या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.
मतदारांचा मतदान सेल्फीला वाढता प्रतिसाद
महाड मतदारसंघात शाळा नंबर 2 मध्ये आदर्श मतदान केंद्र उभे केले होते. या केंद्रावर सकाळपासून गर्दी दिसून येत होती. या ठिकाणी मतदान केल्यानंतर ‘मला अभिमान आहे मतदान केल्याचा’ या सेल्फी केंद्रावर मतदार आवर्जून जाऊन सेल्फी काढून घेत होते. महाड मतदारसंघातील अनेक मतदार हे नोकरीनिमित्त मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरात वास्तव्यास आहेत. या मतदारांना मतदानासाठी आणण्याचे प्रयत्न केले होते. या मतदारांची संख्यादेखील अधिक असल्याने उमेदवारांचे भवितव्य या मतदारांवर अवलंबून आहे. हे मतदार खाजगी वाहनाने गावी दाखल झाल्याने महामार्गावर, तसेच अन्य रस्त्यांवर मोठ्या बसेसची आणि खाजगी वाहनांची गर्दी दिसून येत होती.
ईव्हीएम यंत्रात 11 ठिकाणी बिघाड
सोमवारी सकाळी मतदानास सुरुवात होताच पळसगाव, चिंभावे, मुठवली, सडे, तेलंगे, नरवन, जुई, कुंभे, शिवथर, महाड येथील 11 ठिकाणी ईव्हीएम यंत्रात बिघाड झाल्याच्या घटना घडल्या, मात्र राखीव यंत्र तत्काळ या ठिकाणी देण्यात येऊन अवघ्या काही मिनिटातच मतदान पूर्ववत करण्यात आले.