Breaking News

महाडचे कुर्ला धरण ओव्हरफ्लो; परिसरातील खोदकामामुळे मातीचा गाळ वाढणार

महाड : प्रतिनिधी

तालुक्यातील कुर्ला गावाजवळ असलेल्या धरणातून महाड शहराला पाणीपुरवठा केला जातो. हे धरण आता तुडुंब भरून वाहू लागले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्ती न झाल्याने धरणाची दूरवस्था झाली आहे. भिंतीत रानटी वनस्पतींची रोपटी उगवल्याने धरण धोक्याचे बनत असतानाच शेजारील खाजगी जागेत होत असलेल्या खोदकामामुळे मोठ्या प्रमाणात माती जावून हे धरण गाळाने भरण्याची शक्यता आहे. महाड शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी 1962 मध्ये कुर्ला धरण उभारण्यात आले आहे. आजही महाड शहरातील वाढत्या लोकसंख्येची तहान कुर्ला धरण भागवत आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता सुमारे 0.511 दशलक्ष घन मीटर आहे. धरणातील गाळ एकदा काढल्याचे सांगण्यात येते मात्र सुमारे चाळीस वर्षात या धरणाची दुरुस्ती अगर गाळ स्वच्छता झालेली नाही. यामुळे सध्या या धरणाची दूरवस्था झाली आहे. धरण परिसरातील जागा खाजगी मालकांच्या आहेत. या खासगी मालकीच्या जमिनींचे सपाटीकरण करताना वृक्षतोड केली जात आहे. यंत्रांचा वापर करून खोदकाम केले जात आहे. खोदकामातील माती पावसाच्या पाण्याबरोबर धरणात येत असल्याने भविष्यात धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचण्याची शक्यता आहे. धरणाच्या भिंतीवर असलेला पदपथदेखील कोसळण्याच्या स्थितीत आहे. पदपथाला मोठे भगदाड पडले आहेत. तर रेलिंग तुटून गेले आहे. धरणाच्या भिंतीवर विविध वनस्पतींची रोपे वाढली आहेत. या रोपांची मुळे भिंतीत खोलवर जाऊन भविष्यात धरणाला धोका निर्माण होऊ शकतो. धरणाच्या शेजारील भिंतीतदेखील रोपांची वाढ झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्याकडे लक्ष दिले न गेल्याने ही रोपे वाढली आहेत. धरणातील पाणी या रोपांच्या मुळातून आत शिरल्यास भिंतीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. महाड नगर परिषदेने काही वर्षापुर्वी कुर्ला धरणाच्या दुरुस्तीचा ठराव मंजूर केला होता. त्यात धरणाचे मजबुतीकरण, गळती काढणे, साईड रेलिंग, पदपथ दुरुस्ती व प्रवेशद्वार उभारणे, सुरक्षारक्षक निवासस्थान, या कामांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार धरणाचे दुरुस्तीबाबत अहवाल तयार करण्याचे काम अकोटेक या कंपनीला दिले आहे. तर या धरणाचे संपूर्ण सर्व्हेक्षण करण्याचे काम नाशीक येथील एका संस्थेला दिली असल्याची माहिती नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे परेश महाडिक यांनी दिली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply