मोनिका महानवर यांची मागणी; कळंबोलीत विजेच्या अति दाबामुळे उपकरणे निकामी
कळंबोली : प्रतिनिधी
महावितरणाच्या अति विद्युत प्रवाहाच्या दाबामुळे कळंबोलीतील एलआयजी सेक्टर 1 या परिसरातील अनेक रहिवाशांची विद्युत उपकरणे निकामी झाल्याने याबाबत महावितरण यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. तसेच याबाबत तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी नगरसेविका तथा सभापती महिला व बालकल्याण मोनिका प्रकाश महानवर यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कळंबोली एलआयजी 2 सेक्टर 1 मधील एबीसीडी विभागात अचानक विद्युत वाहिनीतून विद्युत प्रवाह वाढल्याने येथील नागरिकांच्या घरातील ट्यूबलाइट, फ्रिज, टीव्ही अशी विद्युत उपकरणे नादुरुस्त झाली. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला असून याबाबत तत्काळ भरपाई देऊन मुख्य विद्युत वाहिनी नव्याने टाकावी, अशी मागणी लेखी पत्राद्वारे मोनिका महानवर यांनी महावितरणकडे केली आहे.
महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे कळंबोलीतील एलआयजी 2 या परिसरातील अनेक नागरिकांची विद्युत उपकरणे निकामी झाली. याला जबाबदार असलेल्या महावितरणने याबाबत भरपाई देऊन या विद्युत वाहिन्या नव्याने दुरुस्त करून द्याव्यात, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू.
-मोनिका प्रकाश महानवर