…तर घोडेबाजार होणार नाही -देवेंद्र फडणवीस
मुंबई ः प्रतिनिधी
राज्यसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील तिन्ही उमेदवारांचे अर्ज सोमवारी (दि. 30) दाखल केले. या वेळी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निवडणुकीमध्ये घोडेबाजार होऊ शकतो म्हटल्यानंतर त्याबाबत फडणवीस यांनी भाष्य केले आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल, माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे आणि कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या तिन्ही उमेदवारांचे अर्ज सोमवारी मुंबईत विधानभवन येथे दाखल करण्यात आले आहेत. अर्ज भरतेवेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप मुंबई अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा, भाजप नेते आशिष शेलार आदी नेते, पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपतर्फे तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. केंद्रीय मंत्री पियुष गोयल पुन्हा एकदा महाराष्ट्रातून निवडून राज्यसभेवर जात आहेत याचा आम्हाला आनंद आहे. अनिल बोंडे यांचा कृषीविषयक अभ्यास आहे. धनंजय महाडिक यांचे सहकार क्षेत्रात मोठे काम आहे. या तिन्ही उमेदवारांचे अर्ज आम्ही भरले आहेत. मला विश्वास आहे की, आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घोडेबाजाराचा आरोप केला होता. त्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. आम्हाला घोडे बाजार करायचा नाही. आमचे तिन्ही उमेदवार निवडून येणार आहेत. त्यांनी निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी तीनपैकी एक उमेदवार मागे घेतला पाहिजे, तर घोडेबाजार होणार नाही. जरी त्यांनी उमेदवार कायम ठेवला तरी आम्ही कुठलाही घोडेबाजार करणार नाही. आमचे तिन्ही उमेदवार महाराष्ट्रातील आहेत. सद्सद्विवेकबुद्धीने काही लोक आम्हाला मतदान करणार आहेत. तिसर्या उमेदवाराचा अर्ज आम्ही विचारपूर्वकच भरला आहे. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्ही तिसरा उमेदवार निवडून आणू, असेही फडणवीस यांनी म्हटले.