महाड : प्रतिनिधी
किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडीमधील परडीमध्ये जमिनीला भेगा पडल्या आहेत. या भेगा दिवसेंदिवस वाढतच असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट आहे. स्थानिक प्रशासनाने येथील कुटुंबांना गावातच इतरत्र स्थलांतरीत केले असून भूगर्भशास्त्र विभागाकडून या परिसराची पाहणी केली जाणार आहे.
रायगडवाडीमधील परडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून जमिनीला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे तेथील घरांनादेखील तडे गेले आहेत. एकीकडे डोंगर आणि दुसरीकडे दरी असल्याने ज्या ठिकाणी ही वसती वसली आहे तो भाग घसरण्याची भीती ग्रामस्थांमध्ये आहे. सातत पडणार्या पावसामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी मुरते. हे मुरणारे पाणीच पुढे भूस्खलनाला कारणीभूत ठरत आहे. यामुळे येथील आठ घरातील 22 ग्रामस्थांना रायगडवाडीमधील मंदिरात हलविण्यात आले आहे. स्थानिक प्रशासनाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर याठिकाणी महसूल विभागाचे कर्मचारी लक्ष देवून आहेत. येथील घडामोडी महाड कंट्रोलला कळवल्या जात आहेत. लवकरच भूगर्भशास्त्र विभागाचे पथक या ठिकाणी भेट देणार असून परिसराची पाहणी करून अहवाल सादर करतील, अशी माहिती महसूल विभागाने दिली. स्थलांतर केलेल्या ग्रामस्थांना शासनाकडून आवश्यक ती मदत करण्यात आली आहे.