महाड ः प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाने नवनियुक्त केंद्रीय मंत्र्यांची जनआशीर्वाद यात्रा आयोजित केलेली आहे. या अंतर्गत केंद्रीय केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे सोमवारी (दि. 23) रायगड जिल्हा दौर्यावर येत आहेत. जनआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून ना. राणे हे दक्षिण रायगडात नागरिकांशी संवाद साधून त्यांचे प्रश्न जाणून घेणार आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जनआशीर्वाद यात्रेचा दक्षिण रायगडातील प्रारंभ सोमवारी सकाळी 9.30 वाजता पाली येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व राष्ट्रीय सरचिटणीस सुनील देवधर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून होणार आहे. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रविशेठ पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार नितेश राणे, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार निलेश राणे, संयोजक माजी आमदार प्रमोद जठार, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, सरचिटणीस मिलिंद पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. पाली येथे सकाळी 10.30 वाजता बल्लाळेश्वराचे दर्शन, 10.45 वा. वाकण फाटा येथे स्वागत, 11.05 वाजता कोलाड फाटा येथे स्वागत, 11.30 वाजता इंदापूर नाका येथे स्वागत, दुपारी 12 वाजता माणगाव येथे सत्कार सोहळा, 1.15 वा. चवदार तळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, 1.35 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे पूरग्रस्तांसोबत बैठक, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, 2.45 वा. महाड एमआयडीसीत कंपनी व्यवस्थापकांसोबत बैठक, 3.15 वा. महाड येथे पत्रकार परिषद, सायंकाळी 4 वा. पोलादपूर येथे स्वागत आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून जनआशीर्वाद यात्रा रत्नागिरी जिल्ह्याकडे मार्गस्थ होईल.