नवी मुंबई : सिडको वृत्त
सिडकोच्या व्हॅली शिल्प आणि सीवूड् इस्टेट या गृहनिर्माण योजनांतील मिळून शिल्लक 272 सदनिकांसाठी अर्ज नोंदणीचा प्रारंभ शनिवारी (दि. 26) दुपारी 2.00 वा. सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते करण्यात आला. सदर 272 सदनिका या उच्च उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न गटांसाठी उपलब्ध आहेत.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला सिडकोतर्फे उच्च आणि मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रारंभ करण्यात आलेल्या या गृहनिर्माण योजनेमुळे नवी मुंबईसारख्या सर्व नागरी सोयीसुविधांनी परिपूर्ण व निसर्गसंपन्न शहरामध्ये वास्तव्य करण्याची संधी पुन्हा एकदा प्राप्त झाली आहे, असे उद्गार उपाध्यक्ष लोकेश चंद्र यांनी काढले.
सिडकोतर्फे नवी मुंबईतील सेक्टर-36, खारघर येथे मध्यम आणि उच्च उत्पन्न गटाकरिता व्हॅली शिल्प, तर उच्च उत्पन्न गटाकरिता नेरूळ येथे पाम बीच मार्गालगत सीवूड इस्टेट फेज-2 या गृहनिर्माण योजनांतर्गत घरे बांधण्यात आली होती. निसर्गरम्य पार्श्वभूमी लाभलेल्या परिसरांत या गृहसंकुलांची निर्मिती करण्यात येऊन गृहसंकुलांतर्गत क्लब हाऊस, जॉगिंग ट्रॅक, गार्डन इ. उच्च दर्जाच्या सुविधाही विकसित करण्यात आल्या होत्या.
योजनेचे वेळापत्रक, अर्ज नोंदणी प्रक्रिया, सदनिकांचा तपशील, अनामत रक्कम, सदनिकेची अंदाजे किंमत इ. सर्व माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या योजना पुस्तिकेमध्ये देण्यात आली आहे. यामुळे अर्जदारांनी अर्ज भरण्यापूर्वी योजना पुस्तिकेचे काळजीपूर्वक अवलोकन करावे. योजना पुस्तिकेचे शुल्कही ऑनलाइन भरावे लागणार आहे. ऑनलाइन प्रक्रियेमुळे एकंदर सर्व प्रक्रिया या पारदर्शक, जलद व सुलभरीत्या पार पडणार आहेत, तसेच अर्जदारांचा वेळही वाचणार आहे.