Breaking News

कर्नाळा बँक ठेवीदारांनी मानले मोदी सरकारचे आभार; ठेवीदार संघर्ष समितीलाही धन्यवाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त

बुडित गेलेल्या बँकांच्या ठेवीदारांना केंद्र सरकारच्या निर्णयानुसार विमा संरक्षणाच्या माध्यमातून पाच लाखांपर्यंतची रक्कम परत मिळणार आहे. याचा लाभ घोटाळा झालेल्या कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांनाही मिळणार आहे. त्यामुळे या ठेवीदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीला धन्यवाद दिले आहेत. याबाबत कर्नाळा बँकेचे ठेवीदार के. सी. पाटील प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यामुळे आता आम्हाला पैसे मिळू शकतील. आजपर्यंत आम्ही अनेक वेळा बँकेत गेलो, पण आम्हाला कोणी विचारत नव्हते. दोन हजार रुपयेसुद्धा मिळत नव्हते. पैसे बुडाल्यातच जमा होते, परंतु आता आम्हाला पाच लाख रुपये मिळतील याचा आनंद आहे. आम्ही बँकेत पैसे मागायला गेलो की ते धमकी द्यायचे. अंगावर रॉकेल ओतून घेईन, असे म्हणायचे. खातेदारांचे पैसे तुम्हीच खाल्लेले आहेत, मग रॉकेल ओतून घेण्याचा प्रश्नच कोठे येतो. आज शेकापवाले मेसेज पाठवतात तुमची माहिती द्या, पण यशवंत नारायणसारखे ज्यांचे लाखो रुपये बँकेत होते ते अनेकदा पैसे मागायला गेले त्यांचे काय? कोरोना काळात हक्काचे पैसे न मिळाल्याने अनेकांचा जीव गेला. शिवाय आता जे पैसे मिळणार आहेत ते विम्याचे असताना शेकापवाले खोटे सांगताहेत की, हे पैसे आम्ही देणार आहोत. याआधी दोन वर्षे लोक बँकेतून रडत बाहेर पडायचे तेव्हा पाच हजार रुपये तरी दिलेत का कोणाला? एक प्रसंग असा होता प्रत्येकाला पाच हजार रुपये देणार असे सांगितले होते. हजार लोकं रांगेत होती. माझे 65 लाख रुपये बँकेत होते. मला रांगेत उभे राहायला सांगितले. 38 हजार रुपयांचे टोकन अजून आहे, मात्र दोन वर्षांत मला 38 पैसेही मिळाले नाहीत. विवेक पाटील सतत फोन करायचे के. सी. पाटील तुम्हाला उद्या पैसे देतो. दुसर्‍या दिवशी बँकेतून फोन यायचा तुमच्या पैशाची सोय झाली नाही. झाली की कळवतो, असेही के. सी. पाटील यांनी सांगितले. कांबळे गुरुजी यांनी म्हटले की, विवेक पाटील यांनी आम्हाला खूप त्रास दिला. बँकेत 100 फेर्‍या मारल्या, पण एकाही फेरीला त्यांनी आम्हाला दाद दिली नाही. प्रत्येकाला अडचण असते, दवाखाने असतात, सुखदुःख असतात. त्याची कोणतीही पर्वा त्यांनी केली नाही. आमची जी ठेव आम्ही भविष्यासाठी ठेवली होती तिचा काडीमात्र उपयोग आम्हाला झाला नाही. त्यांनी आमच्यावर अन्यायच केला आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला पैसे मिळवून देण्यासाठी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समिती तयार आहे. त्यांचे मी आभार मानतो. सुनीता कांबळे आपला अनुभव सांगताना म्हणाल्या, माझी 35 लाख रुपयांची एफडी कर्नाळा बँकेत होती. मला घर बांधायचे असल्याने मी पैसे काढायला जायचे, पण मला उद्या ये परवा ये, असे सांगितले जायचे, मात्र त्यांनी एकही पैसा दिला नाही. मुलांच्या नावाने आरटीजीएस करा सांगितले. आम्ही मुलांच्या नावाने आरटीजीएस केले. त्याचा नंबर हजारच्या वर दाखवतो, पण पैसे काही मिळाले नाहीत. पुन्हा गेल्यावर आम्ही काय पैसे बुडवतो काय? आमच्यावर विश्वास ठेवा असे सांगायचे. मी निवृत्त झाल्यावर माझे पैसे मुलांच्या भविष्यासाठी विश्वासाने कर्नाळा बँकेत ठेवले होते, मात्र त्यातील एकही पैसा मिळाला नाही. परवासुद्धा मी गेले होते तेव्हा सांगितले आमचे लायसन्स रद्द झाले आहे. आम्ही काहीच करू शकत नाही. कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या बैठकीला आल्यावर आमच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. प्रशांतदादा, महेश बालदी साहेब यांच्या प्रयत्नाला यश येईल आणि आम्हाला पैसे मिळतील. आम्हीदेखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. गव्हाणच्या कल्पना बळीराम कडू यांनी सांगितले की, माझ्या सासू-सासर्‍यांचे जमिनीचे 50 लाख रुपये होते. मी पैसे मागायला गेल्यावर मला कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीत भेटायला बोलावले. तेथे मला सांगितले पैशाच्या बदली आम्ही तुला ब्लॉक देतो, पण माझ्या मिस्टरांनी सांगितले तुम्ही कोणाचा तरी ब्लॉक मला देणार. उद्या मालक आला की तो ताब्यात घेणार. त्यापेक्षा तुम्ही पैसेच द्या. त्यांनी पैसे काय मिळणार नाहीत ब्लॉकच घ्या सांगितले. मी ब्लॉक घेतला नाही. नंतर मला पैसे देतो सांगितल्याने मी लहान मुलाला घरी ठेवून सकाळपासून येऊन संध्याकाळी 6 वाजेपर्यंत थांबले. मग उद्या या, इथे भेटा तिथे भेटा सांगून भेटायचे नाहीत. परत ब्लॉक घ्या सांगायचे. आम्ही तो न घेता फेर्‍या मारत राहिलो, मात्र आम्हाला काहीच भेटले नाही. दोन वर्षे आम्ही नैराश्येत होतो. कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या बैठकीला आल्यावर तिन्ही साहेबांनी दिवाळीपर्यंत पैसे मिळतील सांगितल्यावर आम्ही खूश झालो. सगळे बोलायचे पैसे बुडाले, पण माझा नवरा बोलायचा बुडणार नाहीत. आई-वडिलांच्या कष्टाचे पैसे आहेत. त्यांच्या कष्टाचे फळ आम्हाला या सरांनी दिलेले आहे. त्यांचे आम्ही आभारी आहोत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply