दहा दिवसांचे गणपतींचे दीड दिवसात विसर्जन
नवी मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाच्या महामारीने एकट्या नवी मुंबईत दोन हजार जणांचा बळी घेतल्याने या उत्सवावर आज दुःखाचे सावट पसरले आहे. याचा सर्वाधिक फटका हा येथील घरगुती गणेशोत्सवाला बसला आहे. साहजिक येथील शहरी भागाबरोबरच विशेषतः गावठाणातील पाच, दहा, चौदा व एकवीस दिवसांचे गणपती आज दीड दिवसांवर आले आहेत. कोणत्या ना कोणत्या घरात माणूस दगवल्याने गणेशोत्सवावर आज दुःखाची छाया पसरली आहे.
कोरोना हे जरी यास एक कारण असले तरीही रोजच बदलत जाणारे शासनाचे धोरणही यास तितकेच जबाबदार असल्याचे येथील भाविकांचे मत आहे. शासनाचा उत्सवाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असाच नकारात्मक राहिल्यास एक दिवस सणवार कायमचेच बंद होतील, अशी भीतीही येथील भाविक व्यक्त करतात. केवळ सणवारांमुळे, देवाच्या दर्शनामुळेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो का ? असा रोखठोक सवाल शिवछाया मित्र मंडळ या नवी मुंबईतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अंकुश वैती यांनी केला आहे.
शासनाने गणेशोत्सव काळात भाविकांना दर्शन बंदीचा फतवा काढल्याने आज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांत फार मोठी नाराजी व्यक्त होत आहे. आज गणेशोत्सव दीड दिवसांवर आल्याने साहजिकच गणेश मूर्तींचे आकार कमी झाले आहेत. आरास, सजावट कमी झाली आहे. मंडप, स्पीकर, डेकोरेशन, बँड, करमणुकीचे कार्यक्रम सादर करणारे भजन कलावंत, लोककलावंत, तबले – पखवाज, हार्मोनियम, टाळ बनविणारे कारागीर, फुलांचे उत्पादन घेणारे शेतकरी या सर्वांच्याच उदरनिर्वाहावर गदा आली असे मत भजनी कलावंत अमृत पाटील यांनी व्यक्त केले.
कोरोना संकटामुळे बाजाराला फार मोठा मंदीचा सामना करावा लागत आहे. साहजिकच या व्यवसायांवर अवलंबून असलेल्या ग्राम कारागिरांवर, व्यापार्यांवर आज उपासमारीची वेळ आली असून जो तो रिकाम्या हातांना काम मिळावा म्हणून झगडतो आहे. म्हणूनच मायबाप शासन या दुसर्या दुखर्या बाजूचा तरी विचार करील का? असा भावनिक सवाल येथे व्यक्त होत आहे.