नगरसेवक राजू सोनी यांची सतर्कता
पनवेल : वार्ताहर
शहरातील टपाल नाका येथील बोहरा यांच्या घराचा लाकडी जिना कोसळला. त्यामुळे त्या घरातील 85 वर्षांच्या आजीबाई आणि वीस ते बावीस वर्षांच्या मुलीला बाहेर निघता येत नव्हते. याची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना मिळताच त्यांनी तत्परतेने पनवेल महानगरपालिका व अग्निशमन दलाला पाचारण केले. त्यानुसार दोघींना सुखरूप खाली उतरविण्यात आले.
नगरसेवक राजू सोनी यांना यासंदर्भात माहिती मिळताच पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त सचिन पवार व धैर्यशील जाधव यांना फोन केला व याची माहिती दिली. तसेच पनवेल महापालिकेच्या अग्निशामक दलाला घटनास्थळी बोलवले व अग्निशामक दलाने पहिल्या मजल्यावरील त्यांच्या घराच्या खिडकीला शिडी लावली आणि 85 वर्षांची आजी व वीस ते बावीस वर्षाच्या मुलीला खाली सुखरूपपणे आणले. राजू सोनी आणि अग्निशामक दल यांच्यामुळे या दोघींना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात यश आले.
या वेळी आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, अग्निशामक दलाचे अनिल जाधव उपस्थित होते. राजू सोनी यांनी तत्परतेने दोन महिलांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याबद्दल परिसरातील व्यापारी बांधवांनी त्यांचे अभिनंदन व आभार मानले आहेत.