Breaking News

स्वच्छ भारत अभियानासाठी पनवेल महापालिकेच्या वतीने विविध स्पर्धा

पनवेल ः प्रतिनिधी
स्वच्छ भारत अभियान 2022साठी पनवेल महापालिका सज्ज झाली असून यात नागरिकांनीही सहभागी व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. यातील विजेत्यांना रोख बक्षीस व चषक देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 23) दिली.
स्वच्छ भारत अभियान 2021मध्ये पनवेल महापालिकेला राज्यात दुसरा आणि देशात 27वा क्रमांक मिळाला होता. या वेळी त्यापेक्षा जास्त प्रगती करून दाखवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्धार करून महापौर डॉ. कविता चौतमोल व सभागृह नेते परेश ठाकूर यांनी फाईव्ह स्टार रेटिंगमध्ये समावेश व्हावा यासाठी प्रशासनाबरोबरच नागरिकांचा सहभाग मिळवा यासाठी  महापालिकेच्या वतीने विविध स्पर्धा आयोजित करण्याचे ठरवले आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी गुरुवारी महापालिकेत बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे, समीर ठाकूर, सुशीला घरत, अनिता पाटील, नगरसेविका रूचिता लोंढे व प्रभाग अधिकारी उपस्थित होते.
या वेळी स्वच्छ भारत अभियान 2022 अंतर्गत विविध गटांत निरनिराळ्या प्रकारच्या प्रभागवार स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. स्वच्छ गृहनिर्माण संस्था, हॉटेल, शाळा, शासकीय कार्यालय, महाविद्यालये व हॉस्पिटल यांच्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. विजेत्यांना प्रभागवार आणि महापालिकास्तरावर रोख बक्षीस व चषक देण्यात येईल. केवळ स्पर्धा म्हणून नाही तर आपल्या परिसरात स्वच्छता टिकवायची आहे म्हणून आपण स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन महापौर डॉ. चौतमोल यांनी केले आहे. याशिवाय एक अनोखी स्पर्धा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची घेण्यात येणार आहे. यामध्ये घरातील जुने कपडे, फुटलेल्या बाटल्या, प्लॅस्टिक यासारख्या टाकाऊपासून एखादी टिकाऊ वस्तू बनवावी. बैलगाडी, पक्षी, मूर्ती यांसारख्या वस्तू बनवून आपण भाग घ्यायचा आहे. आपल्या  कलाकृतीचे प्रदर्शन भरवून उत्तम कलाकृती शहरातील चौकात ठेवण्यात येईल. त्यामुळे आपले नाव सर्वांपर्यंत पोहचेल तसेच आपल्याला महापालिकेतर्फे गौरवण्यातही येईल, असेही त्यांनी सांगितले आहे.
स्पर्धकांनी आपली नोंदणी 10 जानेवारीपर्यंत महापालिका कार्यालयात ऑनलाइन किवा ऑफलाईन करायची आहे. प्रजासत्ताक दिनी म्हणजेच 26 जानेवारी रोजी विजेत्यांना गौरवण्यात येणार आहे.

पनवेल महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत सर्वेक्षण अभियान 2022  अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी आपली  नोंदणी महापालिका कार्यालयात ऑनलाइन किंवा ऑफलाईन करावी. याशिवाय एक अनोखी स्पर्धा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची घेण्यात येणार आहे. त्यातही सहभाग घ्यावा.
-डॉ. कविता चौतमोल, महापौर

नागरिकांनी सहभाग घ्यावा -सभागृह नेते परेश ठाकूर
पनवेल महापालिकेचा स्वच्छ भारत अभियान स्पर्धा 2021मध्ये महाराष्ट्रात दुसरा, तर देशात 27वा क्रमांक आला. मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा नसतानाही पनवेल महापालिकेने चांगल्या प्रकारे प्रगती केली आहे. आता पनवेल शहराचा फाईव्ह स्टार रेटिंगमध्ये समावेश व्हावा यासाठी स्वच्छ भारत अभियान 2022मध्ये सर्वांनी सहभागी व्हावे याकरिता पनवेल महापालिकेने स्पर्धा जाहीर केली आहे. यामध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा. नागरिकांनी हिरीरीने सहभागी होऊन इतरांनाही भाग घ्यायला लावावा, म्हणजे आपल्या आजूबाजूच्या संस्थांचा दर्जा काय आहे हे सर्वांना समजू शकेल व तो सुधारण्यासाठी येथे प्रयत्न होऊ शकेल, असे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी म्हटले आहे.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply