Breaking News

नवीन पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र मनपाकडून मंजूर

स्थायी समितीच्या सभेत विविध विषयांना मंजुरी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेची स्थायी समितीची ऑनलाईन पद्धतीने सभा स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 9) झाली. या सभेत पनवेल महापालिका हद्दीतील नवीन पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र विकसित करण्यासाठीची मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर 46 विषय मांडण्यात आले होते. त्यातील 44 विषयांना मंजुरी देण्यात आली, तर दोन विषय नामंजूर करण्यात आले. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक प्रकाश बिनेदार, मुकीद काझी, अजय बहिरा, प्रवीण पाटील आदींसह अधिकारी उपस्थित होते.
या वेळी अन्य विषयांमध्ये पनवेल महापालिकेकरिता कीटकनाशके व रासायनिक जंतुनाशके पुरविणे, पनवेल शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची उंची वाढविणे व त्या परिसराचे सुशोभीकरण, महापालिकेच्या मालकीच्या इमारतीची देखभाल व दुरुस्ती वार्षिक तत्त्वावर करणे, प्रभाग समिती ‘ड’ प्रभाग क्रमांक 20मधील तक्का गाव येथे मलनिस्सारण वाहिन्या टाकणे, अंतर्गत गटाराचे बांधकाम करणे, प्रभाग समिती ‘ड’ प्रभाग क्रमांक 19मधील मच्छी मार्केट व पार्किंगमधील रस्ता काँक्रिटीकरण करणे व पार्किंग क्षेत्रातील जमिनीची उंची वाढविणे, प्रभाग समिती ‘ड’मधील विविध रस्त्यांचे डांबरीकरण करणे, मलनिस्सारण वाहिन्या टाकणे, गटार बांधण्याचे काम करणे, प्रभाग समिती ‘क’मधील विविध ठिकाणचे अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे, प्रभाग समिती ‘ब’मधील रोडपाली  बौद्धवाडी येथील कासाडी नदी लगतच्या दगडाचे पिचिंग करणे या कामांचे विषय मंजूर करण्यात आले.
तसेच पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘अ’ प्रभाग क्रमांक 1मधील रोहिंजण व किरवली गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, प्रभाग क्रमांक 3मधील तळोजे मजकुर व घोट गाव येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण व गटार बांधकाम करणे, धरणा गाव व धरणा कॅम्प गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण व गटार बनविणे, नागझरी गावातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, प्रभाग क्रमांक 3मधील पापडीचा पाडा येथे रस्त्यांचे काँक्रिटीकरण व गटर बांधणे, तसेच खुटूकबांधन आणि ईनामपुरी येथील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘ड’मधील प्रभाग क्रमांक 18मधील छत्रपती संभाजी महाराज मैदान विकसित करण्याच्या विषयास मंजुरी देण्यात आली.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचारासाठी टेस्ट किट खरेदी करणे आणि कोव्हिड-19 परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीच्या वेळी आवश्यक असणार्‍या औषधी साहित्याच्या ई-निविदांच्या दरांना मान्यता मिळण्याबाबत विषय मंजूर करण्यात आला. या सभेत दोन विषयांना नामंजुरी देण्यात आली असून यामध्ये पनवेल महापालिका मालकीच्या 14 एमएलडी क्षमतेच्या सांडपाणी प्रक्रिया प्लँटची निगा, दुरुस्ती व देखभाल करणे आणि पनवेल महापालिका हद्दीत केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियान अंतर्गत सन 2015-2016, 2016-2017 अंतर्गत हरित क्षेत्र विकसित केलेल्या, वृक्षलागवड व लॉन या झालेल्या कामांची निगा, दुरुस्ती, देखभाल करण्याबाबतच्या विषयांचा समावेश आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply