Breaking News

आम्हाला पुन्हा संधी मिळणार -फडणवीस

नवी मुंबई ः प्रतिनिधी

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत बोलताना सूचक विधान केले आहे. अण्णासाहेब पाटील यांच्या 88व्या जयंतीनिमित्त शनिवारी (दि. 25) माथाडी कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात फडणवीसांनी आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे, असे विधान केले.

या कार्यक्रमास माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, युवा मोर्चा अध्यक्ष दत्ता घंगाळे, नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माथाडी कामगार उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, माथाडी कामगार चळवळीसाठी आमच्या सरकारने सर्व दरवाजे पूर्णपणे उघडे केले होते. माथाडी नेत्यांनी कधीही प्रश्न मांडले की आम्ही ते सोडवायचो, अशी व्यवस्था आम्ही उभी केली होती. पुढचा काळ मिळाला असता, तर उरलेले प्रश्नही सोडवले असते. या सरकारला आता माथाडींचे प्रश्न सोडवण्याची संधी आहे, तेही सोडवतील असा मला विश्वास आहे. नाही सोडवले तर आम्हाला पुन्हा संधी मिळणार आहे. तेव्हा आम्ही ते प्रश्न सोडवू. तीही अडचण नाही. लोकशाहीमध्ये कमी-अधिक होत असते. कधी हे असतात, कधी ते असतात, पण कामगारांचे प्रश्न पक्षाच्या पलीकडे जाऊन पाहायला हवेत.

दरम्यान, या वेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून आपण हा कार्यक्रम करत आहोत, असे नमूद करताना नरेंद्र पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा दाखला देवेंद्र फडणवीस यांनी दिला. आज करोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम आपण घेतला. नरेंद्र पाटील म्हणाले होते की, केंद्रीय मंत्री या कार्यक्रमात यायला हवेत. मी त्यांना म्हटले की आपल्या कार्यक्रमात संख्या इतकी असते की कोविडचे नियम मोडल्याबद्दल आपल्यावर नक्की गुन्हा दाखल होईल, पण नरेंद्रजींनी याच वर्षी केंद्रीय मंत्र्यांना बोलवायला सांगितले. ते म्हणाले, काही काळजी करू नका. नियमानुसार दोन्ही डोस घेतलेले लोक सभागृहात उपस्थित राहतील आणि इतर सगळे जण ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रम पाहतील. मी भूपेंद्र यादव यांचे आभार मानतो की त्यांनी फक्त एका फोनवर कार्यक्रमाला येण्यासाठी होकार दिला, असे फडणवीस म्हणाले.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती न लावल्यामुळे नरेंद्र पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. माथाडी कामगारांच्या प्रश्नावर राजकारण न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply