Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींमुपंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे देशाला विकासाची दिशाळे देशाला विकासाची दिशा

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांचे प्रतिपादन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
काँग्रेसच्या काळात योजना बारगळायच्या, तर मोदी सरकारमुळे तळागाळातील लोकांपर्यंत योजना पोहचल्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे देशाला विकासाची दिशा मिळाली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, कामगार व वनेमंत्री तथा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस भूपेंद्र यादव यांनी शनिवारी (दि. 25) येथे केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंतीनिमित्त सेवा व समर्पण अभियान अंतर्गत रायगड जिल्हा भाजपच्या वतीने खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते प्रमुख मान्यवर म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सेवा व समर्पण महाराष्ट्र राज्य प्रमुख माजी आमदार राज के. पुरोहित, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आमदार योगेश सागर, आमदार रविशेठ पाटील, आमदार महेश बालदी, महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, संजय उपाध्याय, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, पेणच्या नगराध्यक्ष प्रितम पाटील, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, माथेरानचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, उरण उपनगराध्यक्ष जयविन कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, विनोद साबळे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष आश्विनी पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, दिनेश खानावकर यांच्यासह जिल्हातील पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शक्ती केंद्र, बूथ अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते दिव्यांगांना मदत, तसेच कुष्ठरुग्णांना धान्यवाटप, स्वच्छ भारत निर्मल भारत अंतर्गत शौचालय लाभार्थी, किसान सन्मान योजना, उज्ज्वला गॅस योजना लाभार्थींचा सन्मान करण्यात आला. तसेच कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत त्याचबरोबर या विद्यार्थ्यांच्या दहावीपर्यंत शिक्षणाची जबाबदारी मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आली. त्या मदतीचे वाटप या वेळी करण्यात आले.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी पुढे म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणाला दिशा देत त्याचे रूपांतर जनसेवेत केले आहे. पंतप्रधान नाही तर प्रधानसेवक म्हणून त्यांनी देशाची जबाबदारी स्वीकारली आणि ते सर्वसामान्य नागरिकाचा विकास हा ध्यास घेऊन जबाबदारी यशस्वीपणे बजावत आहेत. सन 2014मध्ये त्यांनी देशाचा कारभार हाती घेतला व त्या वेळी भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करण्याचा निर्धार केला. विविध योजना राबवित असताना त्यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयचा विचार रूजवला. त्यामुळे तळागाळातील सर्व लाभार्थींना 100 टक्के लाभ मिळत आहे. पुन्हा एकदा 2019मध्ये पंतप्रधान मोदींना जनतेचा आशीर्वाद मिळाला आणि त्या आशीर्वादाने ते जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र काम करीत आहेत.
जगात कोरोनाचे संकट आले, पण आपल्या पंतप्रधानांनी वेळेवर व योग्य निर्णय घेत आवश्यक उपाययोजना केल्या. दुसरे सरकार असते तर कोरोनाची लढाई जिंकू शकले नसते कारण देशाच्या आणि नागरिकांच्या विकासाची जबाबदारी त्यांना पेलवली नसती, असेही मंत्री यादव यांनी या वेळी नमूद केले. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शेतकरी, उद्योग, गरिबांचे काम केले. अनेक योजना प्रभावीपणे अमलात आणल्या. त्यामुळे फडणवीस यांचा कार्यकाळ महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णकाळ होता, असे सांगतानाच महाराष्ट्राच्या पुढच्या निवडणुकीत भाजपचे सर्व आमदार भरघोस मतांनी निवडून येतील, असे सुतोवाचही त्यांनी केले.
या वेळी मंत्री यादव यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचाही गौरव केला. रामशेठ ठाकूर यांच्याकडून लोकांची प्रदीर्घ काळापासून सेवा केली जात असून त्यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या मदतीला तोड नसल्याचे मंत्रीमहोदयांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले. आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी या विभागाचे सक्षम नेतृत्व असल्याचे सांगत या दोन्ही आमदारांनी पेणचे मूर्तिकार, माथेरान, पनवेल रेल्वेस्थानक, कर्नाळा अभयारण्य अशा विविध केलेल्या मागण्या व सूचनांना न्याय देणार असल्याचे सांगितले.
गणेशोत्सवात मंडळांसाठी मोठ्या मूर्ती बनवताना प्लास्टऱ ऑफ पॅरिसचा वापर करावा लागतो. त्यावर बंदी आणल्याने रायगड जिल्ह्यातील विशेषत: पेणच्या गणेशमूर्ती बनवणार्या कलाकारांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. प्रत्यक्षात गणेशमूर्तीमूळे पर्यावरणावर परिणाम होत नाही, तर त्या रंगवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या रंगामुळे प्रदूषण होते. पर्यावरण खाते सांगेल ते रंग आम्ही वापरण्यास तयार आहोत. त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना परवानगी देण्याची मागणी आमदार महेश बालदी यांनी या वेळी केली.  याबाबत केंद्रीय पर्यावरण व वनेमंत्री भूपेंद्र यादव यांनी आमच्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जे नियम आहेत त्याबाबत चर्चा करण्यासाठी तुम्ही या, तुमचे स्वागत होईल आणि निश्चित त्यातून मार्ग काढला जाईल असे सांगून मूर्तिकारांना मोठा दिलासा दिला.
माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोरोना काळात पदरचे पाच कोटी रुपयांचे अन्नधान्य गोरगरीब गरजूंना वाटप केले असून ते खर्‍या अर्थाने गरिबांचे कैवारी आहेत, असे स्पष्ट केले. मोदीजी आपला वाढदिवस साजरा करू देत नाहीत, मात्र पक्ष लोकोपयोगी उपक्रम राबवून अखंडपणे सेवेचे व्रत सुरूच ठेवतो. इंदिरा गांधी यांनी 1971मध्ये गरिबी हटाव नारा दिला, योजना आणल्या, मात्र राजीव गांधींनी सांगितल्याप्रमाणे सरकारकडून आलेल्या एक रुपयापैकी लाभार्थीच्या पदरात पंधरा पैसेच पडायचा. मधले दलाल ते पैसे खायचे, मात्र मोदी सरकारमध्ये लाभार्थीला 100 टक्के लाभ दिला जात आहे. येथे दलालांना थारा नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी साकारलेल्या योजना लोकप्रिय ठरल्या. मोदींमुळे गरीबाचा पैसा गरिबाला मिळाला लागला. मोदी सरकारच्या सात वर्षांच्या काळात भ्र्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही, मात्र महाराष्ट्रात 21 महिन्यांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये दररोज भ्रष्टाचाराची तक्रार पहायला मिळत आहे. मोदींनी कार्यसंस्कृती आणली. त्यामुळे कोरोना असो, लस असो, योजना, विकासकाम असो देशातील प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्र राज्य लसीकरणात एक नंबर आहे याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे, पण केंद्राने लस मोफत आणि कोणतेही राजकारण न करता जास्त संख्येत दिली याचा विसर राज्य सरकारला पडला असल्याची टीकाही त्यांनी केली. कोरोना काळात सर्वांत जास्त मदत भाजपने केली. त्यामुळे आम्ही टीकेने नाही तर कृतीने उत्तर देतो, असेही त्यांनी खणखणीत आवाजात सांगितले. भाजप जनसेवा करणारा पक्ष आहे त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत त्याचा अधिकार देण्यासाठी कटिबद्ध आहोत असे सांगतानाच या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर, तिन्ही आमदार आणि टीमचे अभिनंदन केले.
प्रास्ताविकपर भाषणात आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोरोना तसेच महापूर, वादळ अशा संकटात भाजपच्या वतीने केलेल्या कार्याचा आढावा विषद केला.
कामाच्या बाबतीत दोघेही आमदार वाघ -देवेंद्र फडणवीस  
या वेळी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांचे कौतुक करताना म्हटले की, प्रशांतजी आणि महेशजी मिळून एक नवीनच रसायन तयार होते. एक अतिशय शांत आहे, तर दुसर्‍याला शांत करावे लागते. कामाच्या बाबतीत मात्र दोघेही वाघ आहेत. पनवेल, उरणच्या विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी या दोघांनी प्रकल्पे मंजूर करून घेतले आहेत. मला माहिती आहे की दोघांनी ठरवले आहे तर ते काहीही करू शकतात. कारण यांच्या मागण्या रास्त आणि पाठपुरावा सातत्यपूर्ण असतो. आता दोघे मिळून भूपेंद्रजींच्या मागे लागून महिनाभरात बैठक लावून त्या पूर्ण करून घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Check Also

सीकेटी विद्यालयात आषाढी एकादशीनिमित्त दिंडी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन …

Leave a Reply