माणगाव ः प्रतिनिधी
कोरोना काळात वर्षासहलीसाठी देवकुंड धबधब्यावर जाण्यास मनाई असतानाही तेथे 50 ते 100 पर्यटकांना घेऊन गेल्याप्रकरणी पाटणूस येथील स्थानिक नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणगाव पोलिसांनी ही कारवाई केली. माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाटणूस गावच्या हद्दीत असलेल्या प्रसिद्ध देवकुंड धबधब्याची सैर करून आणण्यासाठी संतोष हरिश्चंद्र गुजर, सुखानंद कुलकर्णी, करण म्हामुणकर, प्रभात म्हामुणकर, नवनाथ पिसाळ, सुरेश दळवी, राजेश सावंत, शिवम मोरे, सुभाष येरुणकर यांनी 50 ते 100 पर्यटक जणांची बुकिंग घेतली होती. कोविड-19 विषाणूचे संक्रमण कायम असल्याने गर्दी जमवू नये असे शासनाचे आदेश असताना एवढ्या मोठ्या संख्येने पर्यटकांना शनिवारी (दि. 3) देवकुंड धबधबा येथे नेण्यात आले होते. शासकीय आदेश झुगारून गर्दी जमविल्याप्रकरणी नऊ जणांवर माणगाव पोलीस ठाण्यात भा. दं. वि. संहिता कलम 188, 269, 270 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005चे कलम 51(1) म.पो.का.क. 37(1)(3) 135 सह साथीचे रोग अधिनियम 1897चे 2,3,4, महाराष्ट्र कोविड-19 अधिनियमन 11प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे.