पनवेल ः बातमीदार
रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षक भरतीकरिता काही दलालांनी आर्थिक व्यवहार करून उमेदवारांची फसवणूक केल्याचे वृत्त आहे. अशा फसवणूक झालेल्या उमेदवारांनी ताबडतोब दलालांविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, असे आवाहन रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे चेअरमन आनंद भोसले यांनी केले आहे.
या संदर्भात रायगड सुरक्षा रक्षक मंडळाचे चेअरमन आनंद भोसले म्हणाले की, गोरगरीब, आदिवासी व गरजू उमेदवारांच्या अडाणीपणाचा तसेच असहाय्यतेचा कोणी दलाल फायदा घेत असतील, तर अशा दलालांविरोधात गुन्हा दाखल करायलाच हवा. पास झालेल्या उमेदवारांचे रेकॉर्ड ऑनलाइन आहेत. त्यामुळे अशा उमेदवारांच्या नोकरीला कोणताही धोका नाही. तरी अशा सर्व उमेदवारांनी समोर येऊन स्थानिक पोलिसांत तक्रार दाखल करावी. अशा उमेदवारांना मंडळाकडून संरक्षण देण्यात येईल, अशी ग्वाहीही आनंद भोसले यांनी दिली.
- भरती नसून नोंदणी प्रक्रिया
रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातर्फे कोणत्याही प्रकारची भरती सुरू नसून ही केवळ नोंदणी प्रक्रिया आहे. उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात येणार्या अनेक कंपन्यांना व वेगवेगळ्या संस्थांकडून येणार्या मागणीप्रमाणे उमेदवारांना त्या संस्थेमार्फत नोकरी उपलब्ध करून देण्यात येते.
- उमेदवारांनी दूर राहावे!
सुरक्षा रक्षक मंडळात प्रतीक्षा यादी बनविण्याचे काम ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइनचा वापर करावा, तसेच संधीसाधू दलालांंपासून दूर राहावे. शासनाच्या
निर्देशाप्रमाणे सेराईज टेक सोल्युशन एजन्सीमार्फत अर्ज मागविणे, छाननी करणे व मैदानी परीक्षा तसेच मेसेज पाठवणे ही कामे करण्यात येतात. उमेदवारांनी ऑनलाइन प्रक्रियेत सहभागी व्हावे.