Breaking News

नेरळ बाजारपेठ पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात

कर्जत : बातमीदार

नेरळ बाजारपेठेतील रस्त्यावर केलेली अतिक्रमणे आतापर्यंत दोनवेळा जमीनदोस्त करण्यात आली होती. मात्र अतिक्रमणे करणार्‍यांना कोणतेही भय राहिले नाही. त्यामुळे आता या बाजारपेठेला पुन्हा एकदा अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. या रस्त्याची मालकी असलेली रायगड जिल्हा परिषद आणि ताबा असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीचे त्यावर कोणतेही नियंत्रण दिसून येत नाही.

नेरळ रेल्वे स्टेशनजवळ असलेला रस्ता आणि गटारांवर अतिक्रमणे करून अनेक  बांधकामे उभारण्यात आली होती. त्यामुळे वाहनेच काय पण पादचार्‍यांनादेखील या रस्त्याने जाणे मुस्कील झाले होते. त्याबाबत नेरळमधील सामाजिक कार्यकर्ते माधव गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यावर जानेवारी 2008 मध्ये नेरळ बाजारपेठेतील रस्त्यावरील अतिक्रमणे सार्वजनिक बांधकाम खात्याने जमीनदोस्त केली होती. मात्र त्यानंतर बांधकाम विभागाने तेथे गटारे बांधण्याचे काम केले नाही. त्यामुळे त्या रस्त्यावर पुन्हा अतिक्रमणे करून दुकाने थाटली गेली. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून मिळालेल्या 23 कोटींच्या निधीमधून नेरळ बाजारपेठेमधील रस्त्यांची कामे करण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा डिसेंबर 2017 मध्ये अतिक्रमणे तोडली होती.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या निधीमधून नेरळ बाजारपेठेतील रस्ता सिमेंट काँक्रीटचा झाला, सोबत रस्त्याच्या बाजूला बांधलेल्या गटारांवर पेव्हरब्लॉक बसवून फुटपाथदेखील तयार करण्यात आला. मात्र या फुटपाथावर अतिक्रमणे होऊ लागली.  नेरळ रेल्वे स्टेशनपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत एका बाजूला 100 टक्के फुटपाथ अनधिकृत व्यावसायिकांनी व्यापला आहे. तर समोरील अर्धा फुटपाथदेखील अतिक्रमणांनी गिळला आहे.

ही अतिक्रमणे दूर व्हावीत, यासाठी अनेकदा नेरळ संघर्ष समितीने उपोषणेदेखील केली आहेत, पण त्याचे भय ना अतिक्रमणे करणार्‍यांना आणि ना काळजी नेरळ ग्रामपंचायतीला, अशी नेरळमधील रस्त्यांची आवस्था झाली आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने बाजारपेठेतील अतिक्रमणे दूर करण्यात आली. मात्र त्यानंतर अनेकदा कारवाई होऊनदेखील रस्त्यावरील अतिक्रमणे आहेत तशीच आहेत. नवीन रस्त्यांलगत फुटपाथ बांधले आहेत. त्यावरही अनधिकृत दुकाने थाटली आहेत. त्याविरोधात  उपोषणे करूनदेखील काहीही फरक पडलेला नाही.  

-माधव गायकवाड, संघर्ष समिती, नेेरळ

नेरळ बाजारपेठेमधील रस्त्यावर अतिक्रमणे करण्यात आली असून, यांच्यावर ग्रामपंचायतीकडून कोणत्याही प्रकारची कर आकारणी केली जात नाही. मात्र मागील मासिक सभेत तेथील टपरीधारक आणि टोपलीवाले यांच्याकडून दैनंदिन पावती फाडण्याचा ठराव घेण्यात आला आहे.

-गणेश गायकर, ग्रामविकास अधिकारी, नेरळ ग्रामपंचायत

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply