नगर ः वृत्तसंस्था
राज्यात गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी महामंडळातील कर्मचार्यांच्या संपाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिला आहे. आपण प्रत्यक्ष संपात सहभागी होऊ शकत नसलो, तरी कर्मचार्यांच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे अण्णांनी म्हटले. एसटी कर्मचार्यांच्या एका शिष्टमंडळाने राळेगणसिद्धी येथे जाऊन हजारे यांची भेट घेतली. त्या वेळी अण्णांनी संपातील कर्मचार्यांसाठी महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यानुसार, सरकारवर दबाव वाढविण्याचेही अण्णांनी सूचवले. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीवरून कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपाचा शनिवारी (दि. 13) पंधरावा दिवस आहे. कर्मचार्यांचा संप अधिक तीव्र होत आहे. आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही संपातून सरकारवर दबाव टाकण्याचे सूचवले आहे.